“पवारांचा अंदाज लावायला मी लहान माणूस…”, भाजपच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य!

On: August 13, 2026 1:21 PM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची NDA मधील घटक पक्षांशी जवळीक वाढत असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. दिल्लीतील एका बैठकीनंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांनी एकत्र प्रवास केल्याने या चर्चांना आणखी बळ मिळालं. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत शरद पवारांच्या राजकीय भूमिकेबाबत सावध विधान केलं आहे.

सुप्रिया सुळे-तावडे यांच्या भेटीवर दरेकर काय म्हणाले? :

बुधवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जलजीवन मिशनशी संबंधित महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर दोन्ही नेते एकाच गाडीतून रवाना झाल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढला जाऊ लागला. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे दोघेही महाराष्ट्रातील नेते असल्याचं सांगत दरेकर यांनी त्यांच्या एकत्र प्रवासाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नसल्याचं म्हटलं. महाराष्ट्राच्या प्रश्नावर जलसंधारणासंदर्भात बैठक झाली आणि त्यानंतर वेगवेगळ्या पक्षांत असलेले दोन नेते एकत्र प्रवास करत असतील, तर त्याचं स्वागत व्हायला हवं, असं त्यांनी स्पष्ट केलं. राजकीय मतभेद बाजूला ठेवून राज्याच्या विकासासाठी नेते एकत्र येत असतील, तर ही महाराष्ट्राच्या दृष्टीने सकारात्मक बाब असल्याचंही दरेकर म्हणाले. त्यामुळे या भेटीत किंवा एकत्र प्रवासात दुसरा कोणताही राजकीय अर्थ शोधण्याचं कारण नसल्याचं त्यांनी नमूद केलं.

Sharad Pawar | शरद पवारांच्या भूमिकेवर दरेकरांचा सावध पवित्रा :

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची NDA मधील पक्षांशी जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना दरेकर यांनी ही जवळीक वाढत असेल तर त्यात वाईट काही नसल्याचं सांगितलं. शरद पवार (Sharad Pawar) हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली असेल आणि त्यातून महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यांवर सकारात्मक वातावरण तयार होत असेल, तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मात्र, शरद पवार नेमकी कोणती राजकीय भूमिका घेतील, याचा अंदाज बांधण्यास आपण फार लहान असल्याचं दरेकर यांनी स्पष्ट केलं. पवारांच्या राजकीय निर्णयांचा अंदाज लावणं सोपं नसल्याचं सांगताना त्यांनी यापूर्वी घडलेल्या घटनांकडे पाहून अनेकदा नंतर त्यांचा संदर्भ लावला जातो, असंही नमूद केलं. मोठमोठ्या राजकीय नेत्यांनाही शरद पवारांचा पूर्ण अंदाज अद्याप आलेला नाही, त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेवर आत्ताच ठाम भाष्य करणं घाईचं ठरेल, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

News title : Pravin Darekar Reacts to Sharad Pawar NDA Buzz

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now