Prajakta Mali | मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारी आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने नुकतीच एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. अभिनयासोबतच उद्योजिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या चतुरस्र कलाकाराने एका लाईव्ह व्हिडिओद्वारे आपल्या पारंपरिक दागिन्यांच्या प्रसिद्ध ब्रँडचे नाव बदलल्याची मोठी माहिती अधिकृतरीत्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत बोलताना या प्राजक्ता म्हणाली, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तिने आपला व्यवसाय नव्या ढंगात सादर करण्याचे ठरवले आहे. पूर्वी ‘प्राजक्तराज’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तिच्या दागिन्यांच्या व्यवसायाला आता ‘प्राजक्तसाज – रिव्हायव्हिंग महाराष्ट्राज लेगसी’ (Prajaktsaj – Reviving Maharashtra’s Legacy) अशी नवी ओळख देण्यात आली आहे. या नव्या टॅगलाईनमध्ये ‘महाराष्ट्र’ (Maharashtra) हा शब्द असावा अशी तिची विशेष इच्छा होती. गुगलवरही हा बदल त्वरित लागू झाला असून नवीन नावाने शोध घेतल्यास माहिती उपलब्ध असल्याचे तिने स्पष्ट केले.
या बदलाविषयी अधिक माहिती देताना ती म्हणाली की, त्यांना या ब्रँडचे बोधचिन्ह (लोगो) देखील बदलायचे होते, परंतु सध्याच्या बोधचिन्हापेक्षा अधिक आकर्षक पर्याय न मिळाल्याने तिच्याच हस्ताक्षरातील जुना लोगो कायम ठेवण्यात आला आहे. सुमारे सव्वातीन वर्षांपूर्वी जेव्हा तिने ही सुरुवात केली, तेव्हा तिला व्यवसायाचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नव्हते. वाढत्या प्रतिसादासोबतच जगभरात माल पाठवताना (शिपिंग) काही अडचणी आल्याने आणि इतर काही वैयक्तिक कारणांमुळे, जी ती उघड करू शकत नाही, तिने हा मोठा निर्णय घेतला. ‘जे होते ते चांगल्यासाठीच’ यावर आपला ठाम विश्वास असल्याचेही तिने आवर्जून नमूद केले व चाहत्यांकडे प्रेमाची मागणी केली.
या अनोख्या व्यवसायाच्या सुरुवातीमागे एक खास वैयक्तिक प्रसंग दडलेला आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा तिच्या सख्या भावाचा विवाहसोहळा ठरला होता, तेव्हा परिधान करण्यासाठी तिला अस्सल मराठमोळे पारंपरिक दागिने हवे होते. मात्र, बाजारात खूप शोध घेऊनही तिच्या पसंतीस उतरेल असे काहीच न मिळाल्याने तिने स्वतःच हे अलंकार घडवण्याचा निश्चय केला. यासाठी तिने संपूर्ण राज्यभर प्रवास करून मराठी मातीतील प्राचीन दागिन्यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यानंतरच अस्सल महाराष्ट्रीयन सौंदर्य खुलवणाऱ्या या उत्पादनांची निर्मिती करून ते सर्वांपर्यंत पोहोचवले.
View this post on Instagram
केवळ आपले जुने अलंकार पुन्हा प्रकाशात आणण्याच्या एका साध्या विचारातून सुरू झालेला हा उपक्रम आज एवढे अवाढव्य रूप धारण करेल, याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. आजघडीला केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण भारतभर (India) आणि जगभरातील अनेक देशांमधून तिच्या दागिन्यांना ग्राहकांची प्रचंड मागणी आणि पसंती मिळत आहे. या यशस्वी व्यावसायिक वाटचालीसोबतच, तिने नुकतीच एक मोठी मालमत्ता म्हणजेच फार्महाऊस देखील खरेदी केले असून, माध्यमांतील वृत्तांनुसार त्यातूनही ती बक्कळ कमाई करत आहे. आता या नव्या नावासह ती आपला व्यवसाय अधिक उंचावर नेण्यास सज्ज झाली आहे.






