Arun Tupe Death | छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध सोशल मीडिया रील स्टार अरुण तुपे यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी (10 मार्च) सकाळी ते त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरही शोककळा पसरली असून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील बालाजी नगर परिसरातील घरात ते अत्यवस्थ अवस्थेत आढळले. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करण्यास सुरुवात केली.
इन्स्टाग्रामवर होता मोठा चाहतावर्ग :
अरुण तुपे हे सोशल मीडियावर त्यांच्या विनोदी आणि अभिनयप्रधान रील्समुळे लोकप्रिय झाले होते. Instagram वर “Kon Arun Tupe” या नावाने त्यांचे अकाऊंट असून त्यांना सुमारे 1.79 लाख फॉलोअर्स होते. त्यांच्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळत असल्यामुळे तरुणांमध्ये त्यांची मोठी लोकप्रियता होती.
विशेष म्हणजे मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी त्यांनी इन्स्टाग्रामवर शेवटचा रील पोस्ट केला होता. त्या रीलवर आलेल्या कमेंट्सना ते रिप्लाय देखील देत होते. त्यामुळे अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
Arun Tupe Death | मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही :
अरुण तुपे यांचा मृतदेह पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती मिळत आहे.
दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांच्या माहितीनुसार अरुण तुपे यांना अपस्मार (फिट्स)चा त्रास होता. मात्र त्यांच्या निधनामागचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडियावर विनोदी आणि सामाजिक विषयांवर रील्स बनवून त्यांनी मोठी ओळख निर्माण केली होती.






