रेव्ह पार्टी प्रकरणी अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांनी राजकारणात खळबळ!

On: July 28, 2025 12:22 PM
Anjali Damania
---Advertisement---

Anjali Damania | पुण्यात रेव्ह पार्टीदरम्यान ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याने आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त झाल्याने राज्यात मोठी खळबळ माजली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या मुद्द्यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया(Anjali Damania) यांनी प्रतिक्रिया दिली असून, ‘वरून अचानक ऑर्डर आल्या म्हणून खडसेंच्या जावयावर अचानक रेड झाली,’ असे दमानिया म्हणाल्या. यामागे काही राजकीय षडयंत्र असल्याचा संशयही अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे.

दमानिया यांनी संशय व्यक्त केला :

अंजली दमानिया यांनी म्हटले की, “कसं आहे की, खडसेंनी मला छळ छळ छळलं म्हणजे गेले कित्येक वर्ष ते मला इतका प्रचंड त्रास देतात. पण काल जेव्हा ऐकलं की त्यांच्या जावयावर अचानकपणे वरून ऑर्डर झाल्या म्हणून रेड झाली, तेव्हा नक्कीच एवढं कळलं की ही काही साधीसुधी रेड नक्कीच नाहीये.” एकनाथ खडसे हे गेले काही दिवस गिरीश महाजन यांच्याविरुद्ध बोलतात, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलीस लावले का, असा संशय दमानिया यांनी व्यक्त केला.

दमानिया यांनी पुढे म्हटले की, “आता प्रांजल खेवलकर Pranjal khewalkar)  यांनी चुकीच्या गोष्टी केल्या असतील, तर त्यांना ती शिक्षा झालीच पाहिजे, त्याबद्दल काही दुमतच नाहीये. पण हे ज्या पद्धतीने झाल आहे, म्हणजे अगदी काही लोकांनाच अटक केली, त्यातील फक्त एकाचं नाव लीक होणं, त्याला रेव्ह पार्टी म्हणणं… खरं सांगायचं तर रेव्ह पार्टी म्हणजे शेकडोनी लोकं असतात, साऊंड असतो, डान्स असतो आणि मग त्यातच ड्रग्स आणि दारू असली तर त्याला रेव्ह पार्टी म्हटलं असतं.” त्यामुळे हे एक राजकीय षडयंत्र आहे, असा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केला.

Anjali Damania | अंजली दमानिया डान्सबारच्या मुद्द्यावरून आक्रमक :

दरम्यान, अंजली दमानिया एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ठाण्यातील डान्सबारच्या मुद्द्यावरूनही आक्रमक झाल्या आहेत. गृहमंत्रालयाकडे ठाण्यातील १५ डान्सबारचे पुरावे दिले आहेत, असे दमानिया यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण केल्यानंतर दमानिया आक्रमक झाल्या आहेत आणि त्यांनी शिंदेंच्या ठाण्यात जे सुरू आहे, त्यावर त्यांचे काय म्हणणे आहे, असा सवालही विचारला आहे.

दमानिया म्हणाल्या की, एकनाथ शिंदे मागे एकदा अधिवेशनात म्हणाले होते की, त्यांनी ५० डान्सबार बंद केले वगैरे. “आताच्या घटकेला मी गृह मंत्रालयाकडे १५ डान्सबारची लिस्ट पाठवली जे सर्रासपणे ठाण्यात चालतात. त्याच्या व्हिडिओ सकट, डिटेल सकट मी हे गृहमंत्रालयाकडे पाठवलं होतं. आणि ते शिंदेंच्या ठाण्यात चालतात, एका वेळेस ४० ते ५० बायका नाचतात याचे व्हिडिओज देखील मी गृह मंत्रालयाकडे पाठवलेत. त्याचा उलगडा सुद्धा आता होईलच, तिथे सुद्धा रेड झाल्यावर एकदा शिंदे काय बोलतात, काय वागतात आणि खरी काय परिस्थिती आहे, ते सगळं जाहीरच होईल,” असे दमानिया म्हणाल्या.

डिटेल्स बाहेर काढण्याचा इशारा दिला :

योगेश कदम Yogesh kadam) यांच्याबद्दल बोलताना दमानिया म्हणाल्या की, त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा तो माणूस व्यवस्थित वाटला. “पण कसं आहे की वडिलांच्या काही मेहेरबान्यांमुळे अनेक गोष्टी होत असतात, तर सावली बारमध्ये मी जेव्हा जाऊन तिथला परवाना बघितला, एफआयआर वाचला, त्याच्या ज्योती कदम यांच्या नावाने परवाना आहे. हा परवाना असताना जर त्याला कोणाला द्यायचं होतं तर तो परवाना रद्द करून नवीन काढणं गरजेचं होतं. त्यांनी केलं नाही आणि कंटिन्यूएशन केलं, ज्याला आपण कंटिन्यू अग्रीमेंट म्हणतो. हे दुसऱ्याच्या नावाने करता येत नाही अशी मला वकिलांनी माहिती दिली आहे.”

या व्यतिरिक्त सुद्धा माहिती आपल्याकडे आलेली असून त्यावर काम करत असल्याचे दमानिया यांनी सांगितले आणि ते उघड झाल्यानंतर बाकीचे डिटेल्स बाहेर काढण्याचा इशारा दिला.

News Title: Political Conspiracy Suspected in Jalgaon Rave Party Case

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now