Prashant Bankar | साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल २४ तासांच्या शोधानंतर आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. डॉक्टर महिलेने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये दोन जणांची नावे स्पष्टपणे नमूद केली होती. पोलिस निरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर. त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी चार पथकं तयार करून शोधमोहीम सुरू केली होती आणि अखेर प्रशांत बनकरला अटक करण्यात यश आलं आहे.
शेवटी शोध लागलाच…
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रात्री उशिरा प्रशांत बनकरला (Prashant Bankar) पुण्यातुन ताब्यात घेतलं. तो पुण्यात त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवर लपला होता. पोलिसांची चार पथकं गेल्या २४ तासांपासून त्याच्या शोधात होती. दरम्यान, दुसरा आरोपी PSI गोपाळ बदने मात्र अद्यापही फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी सातारा पोलिसांनी कसून तपास सुरू ठेवला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत बनकर हा घटनेनंतर गाव सोडून पळाला होत. मात्र, स्थानिकांकडून मिळालेल्या सूचनांनंतर पोलिसांनी त्याला अखेर बेड्या ठोकल्या.
डॉक्टर महिलेच्या आत्महत्येने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरलं आहे. मृत्यूपूर्वी तिने हातावर लिहिलेल्या नोटमध्ये, “PSI गोपाळ बदने हा माझ्या मृत्यूला जबाबदार आहे; त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. तसेच प्रशांत बनकर (Prashant Bankar) गेल्या चार महिन्यांपासून माझा मानसिक व शारीरिक छळ करत आहे,” असे लिहिले होते. या उघडकीनंतर दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Prashant Bankar | राजकीय वर्तुळातही तापलेलं वातावरण:
या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही ताप निर्माण केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या घटनेची दखल घेत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय, शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात सत्ताधारी नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “सर्व शासकीय कामात आमदार सचिन कांबळे आणि अभिजित निंबाळकर हस्तक्षेप करतात,” असा दावा करत दानवे यांनी दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सातारा पोलिसांकडून अद्याप दुसऱ्या आरोपी PSI गोपाळ बदनेचा शोध सुरू असून तो अजूनही फरार आहे. या प्रकरणामुळे राज्यात प्रशासन आणि पोलिस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. नागरिक आणि वैद्यकीय संघटना या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर न्यायालयात उभे करण्याची मागणी करत आहेत. या आत्महत्येने एकंदरीत राज्यभरात संतापाची लाट पसरली असून आता दुसरा आरोपी कधी पकडला जातोय यावर सर्वांचे लक्ष लागलं आहे.








