PM Surya Ghar Scheme | देशात वाढत्या वीज बिलांच्या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना’मुळे आता सर्वसामान्य नागरिकही स्वतःची वीज तयार करून खर्च कमी करत आहेत. या योजनेमुळे लाखो कुटुंबांचे वीज बिल शून्याच्या जवळ आले असून ऊर्जा क्षेत्रात मोठा बदल घडतोय.
योजनेमुळे लाखो घरांना दिलासा
13 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू झालेल्या या योजनेसाठी सरकारने तब्बल 75,021 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आतापर्यंत 25 लाखांहून अधिक घरांमध्ये सौर पॅनेल बसवले गेले असून 12.5 लाख कुटुंबांना किमान एक महिन्यासाठी शून्य वीज बिल मिळाले आहे. 2027 पर्यंत 1 कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, तसेच प्रत्येक कुटुंबाला 78,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. या मोहिमेत गुजरात आघाडीवर असून महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश त्याच्या पाठोपाठ आहेत.
सौर क्रांती वेगात
या योजनेत काही अडथळेही दिसून येतात. सोलर स्क्वेअर (Solar Square) च्या श्रेया मिश्रा (Shreya Mishra) यांच्या मते, बँक कर्ज प्रक्रिया वेळखाऊ आहे. फ्रीअर एनर्जी (Freyr Energy) चे सौरभ मर्दा (Saurabh Marda) यांनी निकृष्ट उपकरणे वापरण्याबाबत इशारा दिला आहे, तर कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर (CEEW) च्या भावना त्यागी (Bhavana Tyagi) यांनी धूळ आणि सावलीमुळे उत्पादनात 20-30% घट होऊ शकते असे सांगितले आहे.
तरीही गुजरातमध्ये लाखो घरांनी छतावर सौर पॅनेल बसवून त्यांना मिनी ऊर्जा केंद्रांमध्ये बदलले आहे. गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड (Gujarat Energy Development Agency) च्या माहितीनुसार, राज्यात 11.9 लाख प्रतिष्ठापनांमधून 6.6 गिगावॅट वीज निर्मिती होते. निकोल येथील अकित कथरोटिया (Akit Kathrotiya) यांनी 4 किलोवॅटची प्रणाली बसवून त्यांचे वीज बिल जवळपास शून्यावर आणले आहे.
नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून राष्ट्रीय पोर्टलद्वारे अर्ज करता येतो. बँकांकडून कमी व्याजदराने कर्ज, 10 वर्षांची परतफेड, नेट मीटरिंग सुविधा आणि 15555 हेल्पलाइनसारख्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.






