PM Kisan 23rd Installment | देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-Kisan Samman Nidhi Yojana) 23व्या हप्त्याबाबत केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केली असून, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच 2,000 रुपये थेट जमा केले जाणार आहेत. या हप्त्यासाठी तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची अट पूर्ण करणे आवश्यक आहे.
23व्या हप्त्याची तारीख आणि निधी :
कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 20 जून रोजी देशातील 9.44 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT) पद्धतीने जमा केले जाणार आहेत. या हप्त्यासाठी केंद्र सरकारने एकूण 18,880 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पश्चिम बंगालमधील हुगळी (Hooghly) जिल्ह्यातील तारकेश्वर (Tarakeswar) येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमातून या निधीचे वितरण करणार आहेत. या हप्त्यानंतर पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली एकूण रक्कम 4.46 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होणार आहे. 20 जून रोजी दुपारपासून लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
PM Kisan 23rd Installment | ई-केवायसीशिवाय मिळणार नाही लाभ :
अनेक शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत असूनही आणि सर्व कागदपत्रे योग्य असतानाही त्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होत नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे सरकारने अनिवार्य केलेली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अपूर्ण असणे. ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांना 23व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर (pmkisan.gov.in) जाऊन होमपेजवरील e-KYC पर्याय निवडावा. त्यानंतर आधार क्रमांक टाकून शोध पर्यायावर क्लिक करावे. आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून प्रक्रिया पूर्ण करता येते. तसेच ‘Know Your Status’ या पर्यायाद्वारे नोंदणी क्रमांक, कॅप्चा कोड आणि ओटीपीच्या मदतीने लाभार्थी स्वतःचे खाते तपशील पाहू शकतात. खात्यावरील सर्व माहिती योग्य असल्यास आणि ई-केवायसीचा दर्जा ‘Yes’ दिसत असल्यास, 2,000 रुपयांचा हप्ता खात्यात जमा होईल.






