IPL 2025 Reschedule l आयपीएल 2025 स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली असून उद्यापासून (22 मार्च) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. मात्र स्पर्धेच्या सुरूवातीपूर्वीच वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.
6 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना ईडन गार्डन्स मैदानावर होणार होता. पण रामनवमीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे, स्थानिक प्रशासनाने सामना हलवण्याची सूचना दिली होती. त्यामुळे बीसीसीआयने वेळीच निर्णय घेत सामना गुवाहाटीला हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
KKR vs RCB सामना होणार निश्चित :
22 मार्च रोजी होणारा KKR आणि RCB यांच्यातील उद्घाटन सामना नियोजित वेळेनुसारच खेळवला जाईल. या सामन्यावर कोणतेही संकट नाही. वेळापत्रकातील बदल केवळ 6 एप्रिलच्या सामन्यापुरता आहे. आता KKR आणि LSG यांच्यातील हा सामना गुवाहाटी येथे होणार असून, दुपारी 3.30 वाजता सुरुवात होईल.
याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता दुसरा सामना हैदराबादमध्ये, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. आयपीएल 2025 मध्ये अशा 12 डबल हेडर सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व सामने शनिवार आणि रविवारीच होतील.
IPL 2025 Reschedule l 74 सामने, 13 शहरं आणि 65 दिवसांचा थरार :
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एकूण 10 संघ सहभागी असून, 65 दिवसांमध्ये 74 सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने भारतातील 13 विविध शहरांमध्ये पार पडतील. यापैकी 62 सामने संध्याकाळी आणि 12 सामने दुपारी खेळवले जातील.
उदघाटन सामना 22 मार्च रोजी असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 मार्चला पहिला डबल हेडर सामना रंगणार आहे. या दिवशी SRH vs RR आणि CSK vs MI हे दोन सामने चाहत्यांना उत्साहाचा दुहेरी डोस देणार आहेत.






