Pune Petrol Price Hike | मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण इस्रायल युद्धाचा परिणाम आता भारतातील इंधन दरांवर दिसू लागला आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पुण्यात प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना आजपासून पेट्रोलसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. (Pune Petrol Price Hike In Pune)
20 मार्च 2026 पासून पुण्यात ‘स्पीड’ आणि ‘पॉवर’ या प्रकारच्या प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ लागू करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या माहितीनुसार, या प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.09 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये पुन्हा महागाईची चिंता वाढू लागली आहे.
पुण्यातील नवीन पेट्रोल दर :
पुण्यात यापूर्वी प्रीमियम पेट्रोलचा दर 111.68 रुपये प्रति लिटर होता. मात्र दरवाढीनंतर आता हा दर 113.77 रुपये प्रति लिटर झाला आहे. म्हणजेच प्रति लिटर 2.09 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (Pune Petrol Price Hike)
सध्या ही वाढ मुख्यत्वे प्रीमियम पेट्रोलवर लागू करण्यात आली असून सामान्य पेट्रोलच्या दरात मोठा बदल झालेला नाही. मात्र जागतिक परिस्थिती कायम राहिल्यास पुढील काळात इतर इंधन दरांवरही परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दरवाढीमागचं मुख्य कारण काय? :
जागतिक तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्यामागे मध्यपूर्वेतील तणाव मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. विशेषतः Strait of Hormuz या महत्त्वाच्या समुद्री मार्गावर तणाव निर्माण झाल्यास जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, जगातील सुमारे 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते. त्यामुळे या भागात कोणताही अडथळा निर्माण झाल्यास जागतिक बाजारात तेलाचे दर आणखी वाढू शकतात. अशा परिस्थितीत भारतासह अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात पुढील काळात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






