Parth Pawar | राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातून महत्त्वाचा निर्णय समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वाची पुनर्रचना सुरू असून आता त्यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. (Maharashtra politics)
राज्यसभेच्या रिक्त जागेवर पार्थ पवारांचे नाव :
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली होती. 31 जानेवारी रोजी झालेल्या शपथविधीनंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला, ज्यामुळे उच्च सभागृहातील जागा रिक्त झाली. या रिक्त जागेवर आता त्यांचा मुलगा पार्थ पवार (Parth Pawar) यांची नियुक्ती होण्याची जोरदार शक्यता व्यक्त होत आहे. (Maharashtra Politics)
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या कार्यकाळाची अजून दोन वर्षे बाकी असून त्यांची मुदत 4 जुलै 2028 रोजी संपणार होती. मात्र, त्या जागेवर पाठवण्याऐवजी पार्थ पवार यांना सहा वर्षांच्या पूर्ण टर्मसाठी असलेल्या दुसऱ्या जागेवर पाठवण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. लवकरच ही जागा भरली जाणार असून त्या दृष्टीने पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
Parth Pawar | पवार कुटुंबातील भूमिका आणि शरद पवारांचा दौरा रद्द :
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर पार्थ पवार (Parth Pawar) आणि जय पवार (Jay Pawar) हे दोघेही राजकारणात अधिक सक्रिय होतील, असा अंदाज आधीपासून व्यक्त केला जात होता. यापूर्वी या दोघांनी बारामती परिसरात लोकसभा आणि निवडणूक प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली असून कुटुंबावर आणि पक्षावर दोघांची जबाबदारी अधिक वाढली आहे. एकीकडे सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून प्रशासन सांभाळतील, तर जय पवार दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील, अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, पक्षाच्या बैठकीत पार्थ पवार (Parth Pawar) यांनी वरिष्ठ नेत्यांशी या संदर्भात सविस्तर चर्चा केल्याचे समजते. याआधी त्यांनी 2019 मध्ये मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत जाणार होते, परंतु त्यांचा हा दौरा अचानक रद्द झाला. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात, जिथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाले होते, त्या स्थळाला भेट दिली. तेथे त्यांनी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर (Kiran Gujar) यांच्याशी अजित पवारांच्या नियोजित स्मृतीस्थळाबाबत चर्चा केल्यानंतर मुंबईकडे प्रस्थान केले होते.






