Pakistan Airspace | जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली असून त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम दिसून येतो आहे. पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर आता युरोपमधील अनेक विमान कंपन्यांनीही पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर बंद केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानला कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागत आहे. (Pakistan Airspace)
पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर बंद
पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार थांबवत व्यापारही स्थगित केला. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केल्याचे वृत्त आहे. यामुळे एअर इंडिया सारख्या कंपन्यांना अरब देशांमध्ये पोहोचण्यासाठी अधिक वेळ लागत आहे, परिणामी आर्थिक नुकसान वाढले आहे.
याच वेळी, लुफ्थांसा, ब्रिटिश एअरवेज, एअर फ्रान्स, स्विस, आयटीए (इटली) आणि एलओटी (पोलंड) या युरोपीय कंपन्यांनीही पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात उड्डाण करणे थांबवले आहे.
पाकिस्तानची एरोस्पेस अथॉरिटी विमान कंपन्यांकडून ओव्हरफ्लाइट शुल्क आकारते. मात्र सध्या अनेक कंपन्यांनी उड्डाण बंद केल्यामुळे दरमहा लाखो डॉलर्सचा तोटा होत आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये भारताने बालाकोट येथे केलेल्या हवाई कारवाईनंतर पाकिस्तानला अशाच प्रकारे 100 दशलक्ष डॉलर्सचा फटका बसला होता. काही अहवालानुसार, भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानच्या हद्दीतून न उडू शकण्यामुळे दरमहा 70 ते 80 दशलक्ष डॉलर्सचा अतिरिक्त खर्च करावा लागतो.
एअर इंडियालाही मोठा फटका
पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे एअर इंडियाला दरवर्षी सुमारे 600 दशलक्ष डॉलरचा आर्थिक फटका बसू शकतो. दीर्घ प्रवास, इंधनाचा वाढलेला वापर आणि वेळेतील वाढ यामुळे प्रवासी सेवांवरही परिणाम होत आहे. पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच्या हवाई क्षेत्राचा वापर कमी होऊ लागला असून, याचे दीर्घकालीन परिणाम त्याच्या अर्थव्यवस्थेवर निश्चितच होणार आहेत.
Title: Pakistan Airspace Faces Huge Loss






