Pune News | पुण्यातील शनिवारवाड्यात महिलांकडून सामूहिक प्रार्थना झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत शनिवारवाड्यासमोर आंदोलनही केले. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी मेधा कुलकर्णींवर निशाणा साधला असून, त्यांचा व्हिडिओ आणि वक्तव्य हे हिंदू-मुस्लिम वाद पेटवणारे असल्याचा आरोप केला आहे.
शनिवारवाड्यातील व्हिडिओनंतर निर्माण वाद
शनिवारवाड्यातील सामूहिक प्रार्थनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मेधा कुलकर्णींनी तीव्र भूमिका घेतली होती. त्यांनी पतीत पावन संघटनेसोबत शनिवारवाड्याच्या परिसरात शिववंदनेचा प्रयत्न केला आणि गोमुत्र शिंपडण्यात आल्याचेही वृत्त समोर आले आहे. पोलिसांनी या सर्व कृतींना मज्जाव केल्याने मेधा कुलकर्णी आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली होती. त्यांच्या या कृतीवरून शहरात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.
सचिन खरात यांनी याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, शनिवारवाडा हे धार्मिक स्थळ नसून एक ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माचा व्यक्ती तेथे येऊ शकतो. “खासदार मेधा कुलकर्णी यांनी धर्माचे राजकारण न करता लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर बोलावे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
Pune News | प्रेम बिराडे प्रकरण झाकण्यासाठी मुद्दा उचलला?
सचिन खरात यांनी आणखी एक गंभीर आरोप करत म्हटले की, “पुण्यातील मॉर्डन कॉलेजमधील बौद्ध विद्यार्थी प्रेम बिराडे याला सर्टिफिकेट न दिल्याने लंडनमधील नोकरी मिळाली नाही. या प्रकरणावर मेधा कुलकर्णी गप्प राहिल्या आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच त्यांनी शनिवारवाड्याचा मुद्दा पुढे आणला.” खरात यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना तोंड फुटले आहे. त्यांनी सांगितले की, एका विद्यार्थ्याच्या भविष्याशी संबंधित गंभीर प्रश्नावर गप्प राहून केवळ धार्मिक भावना भडकवणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी नाही. “सामाजिक न्याय आणि शिक्षण यावर लक्ष केंद्रित करा, धर्माच्या नावावर मतं गोळा करू नका,” असे आवाहनही त्यांनी केले.
सचिन खरात यांनी आपल्या वक्तव्यात मेधा कुलकर्णींना थेट सवाल केला की “जर शनिवारवाड्यातील नमाज पठणामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याच ठिकाणी असलेल्या मस्तानी दरवाजामुळे का दुखावत नाहीत?” त्यांनी पुढे विचारले की, “बाजीराव आणि मस्तानी यांचा मुलगा शमशेर होता. तुम्हाला बाजीराव मान्य आहेत, मग शमशेरबद्दल तुमचं मत काय?”
खरात यांनी यावरून मेधा कुलकर्णींना हिंदू-मुसलमान वादावरून राजकारण करणाऱ्या नेत्या म्हणून टीका केली. आता या आरोपांना मेधा कुलकर्णी काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्याच्या राजकीय वातावरणात या वक्तव्यामुळे नव्या वादळाची चाहूल लागली आहे.








