Smartphone Price Increase | जर तुम्ही मार्च महिन्यात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. स्मार्टफोन बाजारात मोठा बदल होणार असून काही लोकप्रिय ब्रँडचे फोन लवकरच महाग होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार Oppo आणि OnePlus या कंपन्यांनी 16 मार्चपासून त्यांच्या स्मार्टफोनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुट्या भागांच्या वाढत्या किमती आणि पुरवठ्यातील अडचणी यामुळे हा निर्णय घेतल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. भारतासह जागतिक बाजारपेठेत हा बदल लागू होणार आहे.
16 मार्चपासून किमती वाढणार :
दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनाद्वारे सांगितले की, उत्पादनासाठी लागणाऱ्या घटकांच्या किमती वाढत असल्याने स्मार्टफोनच्या किमतीत बदल करावा लागत आहे. त्यामुळे 16 मार्चपासून नवीन किमती लागू होतील. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असून काही मॉडेल्स अधिक महाग मिळू शकतात.
सुरुवातीला किमती वाढीचा परिणाम मुख्यतः बजेट सेगमेंटमधील फोनवर दिसण्याची शक्यता आहे. विशेषतः ओप्पोच्या K आणि A सीरिजमधील काही स्मार्टफोन महाग होऊ शकतात.
त्यामध्ये Oppo K14x, Oppo K13 Series, Oppo K12x तसेच Oppo A6 Series आणि Oppo A5 Series यांसारख्या मॉडेल्सचा समावेश असू शकतो.
दुसरीकडे, ओप्पोची प्रीमियम लाइनअप जसे की Oppo Find Series आणि Oppo Reno Series यांच्यावर सध्या तरी किंमत वाढीचा परिणाम होणार नसल्याचे संकेत आहेत.
Smartphone Price Increase | किती टक्के वाढ होऊ शकते? :
कंपन्यांनी अद्याप अधिकृतपणे वाढीचे अचूक प्रमाण जाहीर केलेले नाही. मात्र बाजारातील अंदाजानुसार स्मार्टफोनच्या किमती सुमारे 15 ते 20 टक्क्यांनी वाढू शकतात.
उदाहरणार्थ, OnePlus 15R हा फोन सध्या सुमारे 47,999 रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. किंमत वाढल्यानंतर या फोनची किंमत 50,000 रुपयांपेक्षा जास्त जाऊ शकते. काही लीक रिपोर्ट्सनुसार त्याची सुरुवातीची किंमत सुमारे 51,999 रुपये असू शकते.
याशिवाय OnePlus Nord 5 Series आणि इतर काही वनप्लस स्मार्टफोनच्या किमतीही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इतर कंपन्याही वाढवू शकतात किमती :
फक्त ओप्पो आणि वनप्लसच नाही, तर इतर स्मार्टफोन उत्पादकांनाही वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात इतर कंपन्याही किमती वाढवू शकतात.
उदाहरणार्थ Samsung आणि Realme यांनी भारतात काही निवडक स्मार्टफोनच्या किमती आधीच वाढवल्या आहेत. तर Vivo आणि iQOO देखील लवकरच असा निर्णय घेऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.






