TET 2026 | राज्यात शिक्षक बनण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maharashtra State Council of Examination) या संस्थेकडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटीईटी 2026 संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे राज्यातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमधील शिक्षक पदासाठी पात्रता ठरवली जाते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता तयारीला सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (teacher eligibility test)
महाटीईटी परीक्षेची तारीख आणि अर्ज प्रक्रिया :
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून 2026 रोजी राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 मार्चपासून सुरू होत असून 16 एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत. परीक्षेचे आयोजन दोन सत्रांमध्ये करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात पेपर क्रमांक 1 सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होईल, तर दुसरे सत्र दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 या वेळेत पेपर क्रमांक 2 साठी ठेवण्यात आले आहे. (mahatet 2026)
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये परीक्षेसाठी केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिक्षक होण्याची संधी मिळवण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात. यंदाही उमेदवारांची संख्या मोठी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे या संदर्भातील अधिकृत माहिती जाहीर केली. राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित तसेच विविध शैक्षणिक मंडळांशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये शिक्षक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. अलीकडेच (Supreme Court) नेदेखील शिक्षक भरतीसाठी टीईटीची सक्ती कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे शिक्षक पदासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये या परीक्षेबद्दलचे महत्त्व अधिक वाढले आहे.
TET 2026 | परीक्षेची रचना आणि मागील आकडेवारी :
महाटीईटी परीक्षा दोन स्तरांमध्ये घेतली जाते. इयत्ता 1 ते 5 मध्ये अध्यापन करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी पेपर 1 घेतला जातो, तर इयत्ता 6 ते 8 साठी शिक्षक बनू इच्छिणाऱ्यांसाठी पेपर 2 आयोजित केला जातो. गेल्या काही वर्षांत या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. (online tet application)
2013 पासून आतापर्यंत एकूण आठ वेळा टीईटी परीक्षा पार पडली आहे. या कालावधीत जवळपास 29.74 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली असून त्यापैकी सुमारे 1.06 लाख उमेदवार पात्र ठरले आहेत. यावरून परीक्षेचा सरासरी निकाल केवळ 3.5 टक्के इतका असल्याचे दिसून येते. मात्र मागील वर्षी झालेल्या परीक्षेत 11.28 टक्के निकाल लागून तो आतापर्यंतचा सर्वाधिक मानला गेला. पुढील काळात परीक्षा परिषदेचा वर्षातून दोन वेळा टीईटी घेण्याचा विचार असून जूननंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणखी एक परीक्षा आयोजित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षक होण्याचे ध्येय असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.






