Omraje Nimbalkar | धाराशिवचे प्रसिद्ध नेते पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar) दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील न्यायालय परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. तब्बल 20 वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणातील निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या सुनावणीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आपल्या कुटुंबीयांसह न्यायालयात उपस्थित असून, त्यांच्या दृष्टीने हा अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा दिवस मानला जात आहे.
न्यायालयात आरोपी आणि दोन्ही बाजूंचे वकील उपस्थित असून खटल्याशी संबंधित तपशीलांचे वाचन सुरू आहे. त्यामुळे अंतिम निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, न्यायालय परिसरात वाढलेल्या गर्दीमुळे सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची कोर्टाबाहेर गर्दी
अलीकडेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेची साथ सोडणाऱ्या सहा खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. इतर पाच खासदार सध्या सार्वजनिकरीत्या समोर नसल्याची चर्चा असताना ओमराजे न्यायालयीन प्रक्रियेसाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. “ऑपरेशन तुडवा” या घोषणेनंतर पक्षाचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर पक्षाकडून त्यांच्याविरोधात तीव्र भूमिका घेतली जात असल्याचेही सांगितले जात आहे.
शिवसैनिकांच्या वक्तव्यांनी वाढली चर्चा
न्यायालयाबाहेर जमलेल्या काही शिवसैनिकांनी माध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली. निवडून आल्यानंतर आणि पक्षत्याग केल्यानंतर त्यांच्यात झालेला बदल पाहण्यासाठी आपण आलो असल्याचे काही कार्यकर्त्यांनी म्हटले.
तसेच, “रात्र गेल्यावर दिवस उगवतो, आमचाही वेळ येईल,” अशा प्रतिक्रिया देत त्यांनी आगामी काळात मोठ्या घडामोडी होण्याचे संकेत दिले. काही कार्यकर्त्यांनी “थोडी प्रतीक्षा करा, लवकरच मोठी बातमी मिळेल,” असेही वक्तव्य केले. त्यामुळे न्यायालयाबाहेरील वातावरण अधिकच चर्चेचा विषय बनले आहे.
निकालासोबत राजकीय घडामोडींवरही नजर
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल हा न्यायालयीनदृष्ट्या महत्त्वाचा असला, तरी त्याचवेळी ओमराजे निंबाळकर यांच्या अलीकडील राजकीय भूमिकेमुळे या प्रकरणाला राजकीय रंगही प्राप्त झाला आहे. कालच त्यांनी पक्षांतराच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली होती.
एकीकडे न्यायालयात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे बाहेर राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. त्यामुळे आजचा दिवस केवळ न्यायालयीन निर्णयापुरता मर्यादित न राहता राज्याच्या राजकीय घडामोडींसाठीही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
News Title: Omraje Nimbalkar Court Hearing Tension Pawanraje Nimbalkar Case






