Village Map Online | राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने नागरिकांसाठी मोठा निर्णय घेत गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही कार्यालयात न जाता, घरबसल्या जमिनीची सविस्तर माहिती मिळणार आहे. यासोबतच ‘प्रत्यय’ नावाची नवी डिजिटल प्रणालीही सुरू करण्यात आली आहे. (Village Map Online)
गाव नकाशा मिळवण्याची प्रक्रिया
राज्यातील कोणत्याही गावाचा नकाशा पाहण्यासाठी http://mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी प्रथम या संकेतस्थळाला भेट द्यावी, त्यानंतर संबंधित जिल्हा, तालुका आणि गाव निवडावा. त्यानंतर ‘गाव नकाशा’ या पर्यायावर क्लिक करताच, निवडलेल्या गावाचा नकाशा दिसेल.
नकाशात सर्वे नंबर टाकल्यास त्या भागाचा तपशील PDF स्वरूपात उपलब्ध होतो. हा नकाशा प्रिंट करून भविष्यातील उपयोगासाठी साठवता येतो. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना वेळ आणि खर्च वाचणार असून, जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सोपे होणार आहेत.
महसूल विभाग होतोय पेपरलेस
महसूल विभागात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी ‘प्रत्यय’ या डिजिटल प्रणालीचा शुभारंभ महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या हस्ते करण्यात आला. ही प्रणाली अर्ज प्रक्रियेपासून सुनावणीपर्यंत सर्व कामे ऑनलाईन करून, संपूर्ण व्यवहार पेपरलेस करणार आहे.
या प्रणालीद्वारे फेरफार, तक्रारी, अपील व पुनर्विलोकन यांसारखे अर्ज डिजिटल स्वरूपात दाखल करता येणार आहेत. अर्जाची सद्यस्थिती, सुनावणीचा वेळ आणि संबंधित बाजू यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. भविष्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घरबसल्या सुनावणीला सहभागी होता येणार आहे.
‘प्रत्यय’ प्रणालीमुळे गैरप्रकारांना आळा बसेल, वेळ आणि खर्चाची बचत होईल, तसेच नागरिकांना जलद सेवा मिळेल. महसूलमंत्र्यांनी याचबरोबर सांगितले की, भविष्यात संपूर्ण सुनावणी प्रक्रिया ऑनलाइन होणार असून, विभागाच्या कामकाजाला वेग येणार आहे.
Title : Now Access Village Map Online via ‘Pratyay’ System






