Raigad | स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या (Raigad) पायथ्याशी असलेल्या ग्रामपंचायतीच्या नावातून ‘निजाम’ शब्दाची ओळख पुसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलेल्या मागणीनंतर, ‘छत्री निजामपूर’ (Chhatri Nijampur) ग्रामपंचायतीचे नाव बदलून ‘रायगडवाडी’ (Raigadwadi) असे करण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी या मुद्द्याला वाचा फोडली होती. स्वराज्याच्या राजधानीच्या (Raigad) ग्रामपंचायतीच्या नावात ‘निजामाच्या खुणा’ कशासाठी हव्यात, असा सवाल करत त्यांनी ‘छत्री निजामपूर’ हे नाव बदलून ‘रायगडवाडी’ करण्याची जोरदार मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नावात बदल करण्याची घोषणा-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या नावात बदल करण्याची घोषणा केली असून, लवकरच नाव बदलण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आता निजामपूर गाव ‘रायगडवाडी’ या नवीन नावाने ओळखले जाणार आहे.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर स्थानिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काही जणांनी ‘निजामपूर’ या नावामागेही एक इतिहास असल्याचे सांगत, नाव बदलायला विरोध दर्शवला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रायगड (Raigad) जिल्ह्यात नावांवरून आणि ऐतिहासिक संदर्भांवरून अनेकदा असे वाद निर्माण होतात.
News Title – Nijampur in Raigad to be Renamed Raigadwadi






