Shirdi Airport | साईभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिर्डी विमानतळावर आता रात्रीच्या वेळेस विमान उतरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. हैदराबादहून आलेल्या पहिल्या विमानाने रविवारी रात्री साडेनऊ वाजता शिर्डी विमानतळावर यशस्वी लँडिंग केलं आणि यानिमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (Shirdi Airport )
पहिलं नाईट लँडिंग यशस्वी, साईभक्तांचा जल्लोष
शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) 60 प्रवाशांना घेऊन आलेलं हैदराबाद (Hyderabad) येथूनचं विमान रविवारी रात्री दाखल झालं. विमान दाखल होताच त्याचे वॉटर सॅल्युटने स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे, भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) हेही या वेळी उपस्थित होते. त्यांनी प्रवाशांचं स्वागत फुलं, साईबाबांचा प्रसाद आणि केक कापून केलं.
2018 साली सुरू झालेल्या शिर्डी विमानतळावर आजपर्यंत हजारो प्रवाशांनी प्रवास केला आहे. मात्र रात्रीची लँडिंग सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा अडचणी येत होत्या. अनेक दिवसांपासून ही मागणी सुरू होती, अखेर ती पूर्ण झाली आणि साईभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचा होणार ‘एव्हिएशन हब’
सुजय विखे पाटील यांनी या वेळी सांगितलं की, नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे याठिकाणी अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याचे आणि विमानांची संख्या वाढवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
अमरावती विमानतळावर एटीआर-72 चाचणी यशस्वी
दरम्यान, महाराष्ट्रातील अमरावती विमानतळावर (Amravati Airport) प्रथमच एटीआर-72 चाचणी विमान यशस्वीरीत्या उतरलं. हे विमान इंदौरहून (Indore) अमरावतीला आलं आणि यामुळे प्रादेशिक हवाई संपर्काच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. हे विमानतळ ‘उडान’ योजनेअंतर्गत (UDAN Scheme) विकसित करण्यात आलं असून, व्यावसायिक विमान सेवेसाठी ते सज्ज झालं आहे.
एमएडीसी (MADC) कडून उभारण्यात आलेला हा प्रकल्प विदर्भासाठी अर्थव्यवस्था, उद्योग, पर्यटन आणि संधींसाठी नव्या दालनाचं प्रवेशद्वार ठरणार आहे. लवकरच अमरावती विमानतळाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे.
Title : Night Landing Begins at Shirdi Airport






