Nigdi to Chakan Metro | पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्या आणि वाहतूक कोंडीचा विचार करता, निगडी-भक्ती-शक्ती चौक ते थेट चाकणपर्यंत मेट्रो मार्गाचा प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहे. महामेट्रो प्रशासनाने या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सुपूर्त केला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सुमारे 75 टक्के भागाला मेट्रो नेटवर्कशी जोडले जाणार आहे. (Nigdi to Chakan Metro)
सध्या पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रोचा विस्तार सुरू आहे. पण, शहराच्या दक्षिण भाग, भोसरी परिसर आणि वाकडसह आयटी हब असलेल्या पिंपळे सौदागर भागाला मेट्रो सेवा मिळावी, अशी नागरिक आणि स्थानिक संस्थांची मागणी होती. त्यामुळे निगडी ते चाकण या मार्गासाठी सुमारे 35 ते 40 किमी अंतराचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
नाशिक फाटा आणि निगडी येथे महत्त्वाची जंक्शन तयार होतील :
नव्या मेट्रो मार्गामुळे नाशिक फाटा आणि निगडी येथे महत्त्वाची जंक्शन तयार होतील. नाशिक फाटा जंक्शनद्वारे भोसरी, चाकण, दापोडी ते निगडी आणि पुणे शहरातील मार्गांना थेट जोड मिळेल. तर, निगडी-भक्ती-शक्ती समूह शिल्प मेट्रो स्टेशनवरून रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव तसेच भोसरी आणि चाकणला मेट्रोने पोहोचता येईल.
भक्ती-शक्ती चौक ते चाकण हा मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गामुळे औद्योगिक भागातील कामगार, विद्यार्थ्यांपासून ते सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत सर्वांना जलद, स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल. (Nigdi to Chakan Metro)
Nigdi to Chakan Metro | पुढील प्रक्रिया आणि कालावधी
या प्रकल्पाच्या डीपीआरला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर, तो राज्य शासन आणि नंतर केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. शासनाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल. महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनावणे यांच्या मते, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अंदाजे 1 ते 1.5 वर्षांचा कालावधी लागू शकतो.
प्रकल्प पूर्ण झाल्यावर दैनंदिन वाहतूक कोंडी कमी होईल आणि सार्वजनिक वाहतूक अधिक कार्यक्षम होईल. यामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.






