Siya Goyal | पुणे (Pune) जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल (Ketan Agarwal) मृत्यू प्रकरणात तपासादरम्यान सातत्याने नवीन माहिती समोर येत आहे. सिया गोयल (Siya Goyal) हिला अटक झाल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला असून, घटनेच्या काही क्षणांपूर्वी आणि त्यानंतर तिच्या हालचालींबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेपूर्वी मोबाईल स्वतःकडे घेतल्याचा संशय :
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतनला दरीत ढकलण्यापूर्वी सियाने त्याचा मोबाईल स्वतःकडे घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे घटना घडली त्या वेळी केतनचा फोन त्याच्याजवळ नसून सियाकडेच का होता, असा महत्त्वाचा प्रश्न तपास यंत्रणांसमोर उभा राहिला आहे. प्राथमिक माहितीनुसार, केतनच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्याचे कुटुंबीय लोहगडावर पोहोचले असता सियाने तो मोबाईल त्यांच्या ताब्यात दिला होता.
दरम्यान, घटना घडल्यानंतर आणि केतनच्या कुटुंबीयांच्या घटनास्थळी पोहोचण्याच्या दरम्यानच्या कालावधीत सियाने काही हालचाली केल्याचा संशय पोलिसांना आहे. याच काळात तिने मोबाईलमधील काही महत्त्वाची माहिती हटवण्याचा प्रयत्न केला असावा, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. त्यामुळे मोबाईलमधील डिजिटल पुरावे या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
Siya Goyal | फॉरेन्सिक तपासावर पोलिसांचा भर :
पोलिसांच्या संशयानुसार, केतनचा मोबाईल सियाच्या ताब्यात असताना त्यातील काही डेटा हटवण्यात आला असावा. यामुळे या मोबाईलची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो फॉरेन्सिक विभागाकडे (Forensic Department) पाठविण्यात येणार आहे. मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा, संदेश आणि इतर डिजिटल पुरावे तपासून घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, केतन खाली पडण्यापूर्वी त्याचा मोबाईल सियाकडे कसा आला, याचाही तपास सुरू आहे.
तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कटाचा भाग म्हणून सिया किल्ल्यावरील उंच ठिकाणी बसून बुटांच्या लेस बांधत असल्याचे नाटक करत होती. ती खाली वाकल्यानंतर चेतन (Chetan) मागून आला आणि त्याने केतनला धक्का दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सिया खाली बसल्यामुळे केतनला स्वतःचा तोल सावरण्यासाठी किंवा सियाचा आधार घेण्यासाठी संधी मिळू नये, तसेच ती स्वतः सुरक्षित राहावी, या उद्देशाने हा डाव आखण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा प्राथमिक अंदाज आहे.






