NEET UG Re Exam | २१ जून रोजी होणाऱ्या आगामी नीट-यूजी (NEET-UG 2026) पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) अत्यंत धाडसी आणि अभूतपूर्व सुरक्षात्मक पावले उचलली आहेत. नुकत्याच झालेल्या पेपरफुटीच्या वादामुळे देशभरात झालेल्या टीकेनंतर, २१ जूनच्या परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सरकारने थेट लोकप्रिय मेसेजिंग ॲप ‘टेलीग्राम’वर (Telegram) तात्पुरती बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यासोबतच प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी थेट भारतीय हवाई दलाला पाचारण करण्यात आले आहे.
माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत टेलिग्रामवर बंदी; मेसेज एडिट फीचर ब्लॉक
२२ जूनपर्यंत संपूर्ण बंदी
एनटीएने (NTA) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९अ (Section 69A of IT Act) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. या निर्देशानुसार, भारतात २२ जून २०२६ पर्यंत टेलिग्रामच्या वापरावर तात्पुरती संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
मेसेज एडिटिंग फीचरवर निर्बंध
या बंदीव्यतिरिक्त, टेलिग्रामचे सर्वात वादग्रस्त ठरलेले ‘मेसेज एडिट फीचर’ (Message-editing feature) ३० जून २०२६ पर्यंत भारतात तात्पुरते ब्लॉक ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील वेळी पेपरफुटी दरम्यान जुन्या मेसेजमध्ये बदल करून किंवा एडिट करून गैरव्यवहार करण्यासाठी या फीचरचा गैरवापर झाल्याचा संशय आहे. हा तांत्रिक पळवाट रोखल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये परीक्षेविषयी पुन्हा विश्वास निर्माण होईल, असा विश्वास एनटीएने व्यक्त केला आहे.
सुरक्षेसाठी हवाई दलाची एन्ट्री; सी-१७ ग्लोबमास्टर आणि एमआय-१७ चा वापर
मागील चुकांमधून धडा घेत केंद्र सरकारने प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीची संपूर्ण साखळीच बदलून टाकली आहे. सुरक्षेमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप किंवा मध्यस्थ राहू नये म्हणून खालील कडक उपाययोजना केल्या आहेत:
हवाई मार्गाने वाहतूक: परीक्षेच्या ५ दिवस आधीच प्रश्नपत्रिका देशातील महत्त्वाच्या परीक्षा केंद्रांवर रवाना करण्यात आल्या आहेत. मात्र, ही वाहतूक कोणत्याही खाजगी कुरिअर, सामान्य पोस्ट किंवा विक्रेत्यांमार्फत न करता थेट भारतीय हवाई दलाच्या (IAF) सी-१७ ग्लोबमास्टर (C-17 Globemaster) या महाकाय विमानांमधून आणि एमआय-१७ (Mi-17) हेलिकॉप्टरद्वारे देशातील १८ प्रमुख शहरांमध्ये हवाई मार्गाने करण्यात आली आहे.
निमलष्करी दलांची सुरक्षा: हवाई दलाची विमाने प्रश्नपत्रिकेचे सीलबंद बॉक्स घेऊन नियुक्त हवाई तळांवर उतरताच, तिथून पुढील सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफ (CRPF – केंद्रीय राखीव पोलीस दल) आणि सीआयएसएफ (CISF – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) च्या जवानांनी आपल्या ताब्यात घेतली आहे.
सरकारी कार्यालयांऐवजी ‘लष्करी स्ट्रॉंग रूम’: सुरक्षेतील संभाव्य त्रुटी टाळण्यासाठी प्रश्नपत्रिकांचे बॉक्स कोणत्याही सामान्य सरकारी कार्यालयात किंवा कोषागारात न ठेवता, लष्करी आणि निमलष्करी दलांच्या थेट देखरेखीखालील अत्यंत सुरक्षित ‘स्ट्रॉंग रूम’ (Strong Rooms) आणि आधुनिक तिजोऱ्यांमध्ये बंद करून ठेवण्यात आले आहेत.
परीक्षा केंद्रांना पोलीस छावणीचे स्वरूप; मध्यस्थ पूर्णपणे बाद
छपाई केंद्रापासून (Printing Press) ते थेट परीक्षा हॉलपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवताना मधे येणारे सर्व हाताळणीचे टप्पे आणि संशयास्पद मध्यस्थ प्रशासनाने पूर्णपणे काढून टाकले आहेत. २१ जून रोजी परीक्षा सुरू असताना केवळ वर्गखोलीतच नव्हे, तर सर्व परीक्षा केंद्रांच्या बाहेरील परिसराला एखाद्या पोलीस छावणीचे स्वरूप दिले जाणार आहे. या अभूतपूर्व आणि कडेकोट लष्करी सुरक्षेमुळे आगामी पुनर्परीक्षा पूर्णपणे निर्दोष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.
News Title: NEET UG Re Exam Telegram Ban IAF Security 2026






