“दादा, आज तुम्ही…!”, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या ‘त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ

On: February 12, 2026 12:10 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे मोठ्या राजकीय घडामोडींचा उलगडा झाल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या तयारीत होते, असा धक्कादायक दावा काकडेंनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर चर्चेत आलेली पोस्ट :

अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती (Baramati) येथे विमान अपघातात निधन झाले. या दुर्घटनेमुळे पवार कुटुंबासह संपूर्ण राज्य हादरून गेले होते. राज्य या धक्क्यातून सावरत असतानाच शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टने नव्या चर्चेला सुरुवात केली आहे.

या पोस्टमध्ये काकडे यांनी अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेल्या पोकळीचा उल्लेख करताना, “आज दादा तुम्ही हवे होतात, आज एक मोठा निर्णय तुम्ही घेणार होतात,” असे भावनिक शब्द वापरले आहेत. या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क सुरू झाले असून, त्यांच्या मृत्यूपूर्वी काही महत्त्वाच्या घडामोडी सुरू होत्या, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Ajit Pawar | १२ फेब्रुवारीला ठरणार होता विलीनीकरणाचा निर्णय :

अंकुश काकडे यांच्या दाव्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू होत्या. पक्षातील फूट संपवून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याबाबत अजित पवार स्वतः प्रयत्नशील होते. या चर्चेतूनच 12 फेब्रुवारी ही तारीख विलीनीकरणासाठी निश्चित करण्यात आली होती, असे काकडेंनी सांगितले आहे.

काकडेंच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी अंतिम घोषणा किंवा अधिकृत स्वाक्षरी होणार होती. या प्रक्रियेत विठ्ठल मणियार (Vitthal Maniyar), श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) आणि स्वतः अंकुश काकडे मध्यस्थी करत होते. मात्र, अजित पवारांच्या अकाली निधनामुळे हा संपूर्ण राजकीय अध्याय अधांतरी राहिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा संभ्रम आणि भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी नेतृत्व स्वीकारत राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तरीही, काकडेंच्या या गौप्यस्फोटामुळे “जर दादा असते, तर आज राष्ट्रवादीच्या इतिहासात नवे पर्व लिहिले गेले असते,” अशी चर्चा पुन्हा एकदा रंगताना दिसत आहे.

News title : NCP Merger Claim Sparks Buzz

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now