Nashik Shirdi Railway Line | नाशिक ते शिर्डी या महत्त्वाकांक्षी दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर वेग आला आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकल्पासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, नाशिक जिल्ह्यातील एकूण 34 गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष आता मोबदला आणि पुढील प्रक्रियेकडे लागले आहे. (Nashik Shirdi Railway Line)
मध्य रेल्वेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार रेल्वे अधिनियम 1989 (सुधारित 2008) आणि केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार भूसंपादनाची कार्यवाही केली जाणार आहे. प्रशासनाकडून लवकरच संपादित होणाऱ्या गट क्रमांकांची यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
सिन्नर आणि नाशिक तालुक्यातील 34 गावांचा समावेश :
या रेल्वेमार्गासाठी सिन्नर तालुक्यातील 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कुंदेवाडी, वडझिरे, दातली, पाथरे खुर्द, दुसुंगवाडी, खोपडी खुर्द, पांगरी खुर्द, मलढोण, खंबाळे, कुंदेवाडी माजरे, सिन्नर, फुलेनगर, ब्राह्मणवाडे, मुसळगाव, देशवंडी, जायगाव, पांगरी बुद्रुक, वावी, सायाळे, पाटपिंप्री, बारागावपिंप्री, भोकणी आणि सुंदरपूर या गावांचा समावेश आहे.
तर नाशिक तालुक्यातील विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, जाखोरी, देवळाली, चेहडी बुद्रुक, संसरी, मोहगाव, बाभळेश्वर, पंचक आणि चाडेगाव या 11 गावांमधून रेल्वेमार्ग जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन शाखेने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. सिन्नर तालुक्यातील गावांची जबाबदारी निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे, तर नाशिक तालुक्यातील गावांची जबाबदारी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. 1) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
Nashik Shirdi Railway Line | शेतकऱ्यांना किती मोबदला मिळणार?
उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांता मंगरुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना रेडीरेकनर दराच्या आधारे मोबदला दिला जाणार आहे. संबंधित जमिनीचे बाजारमूल्य, स्थान आणि इतर निकषांचा विचार करून अंतिम भरपाई निश्चित केली जाईल.
रेल्वे अधिनियमांतर्गत ही प्रक्रिया कमी कालावधीत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. गट क्रमांक जाहीर झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात येतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन सुरू होईल.
दरम्यान, प्रस्तावित रेल्वेमार्गाची अंतिम लांबी, स्थानकांची संख्या आणि त्यांची निश्चित ठिकाणे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. रेल्वे मंत्रालयाच्या यंत्रणेमार्फत मार्गाचे प्राथमिक आरेखन पूर्ण झाले असून, फेरसर्वेक्षणानंतर काही ठिकाणी किरकोळ बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.






