Nashik Ring Road | नाशिक शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा बाह्य रिंगरोड प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाल्याने शहरवासीयांना लवकरच अधिक वेगवान आणि सुसह्य प्रवासाचा लाभ मिळणार आहे. जमिनीच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाने महत्त्वाची प्रगती साधली आहे.
जमीन संपादन प्रक्रियेला गती :
नाशिक शहरालगत प्रस्तावित असलेल्या बाह्य रिंगरोडसाठी एकूण 364 हेक्टर क्षेत्राची आवश्यकता निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी खासगी जमिनी थेट खरेदी पद्धतीने संपादित केल्या जाणार आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारीपर्यंत 134.2 हेक्टर खासगी जमिनींसाठी जमीनधारकांकडून लेखी संमती प्राप्त झाली आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत असून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू आहे.
याशिवाय 16 गटांमधील सुमारे 20 हेक्टर शासकीय जमीन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एकूण अपेक्षित जमिनीपैकी जवळपास निम्मे क्षेत्र निश्चित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 51 टक्के जमिनींची संमती मिळवण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असून त्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र करण्यात आले आहेत.
Nashik Ring Road | 25 गावांमधून जाणारा 65.1 किमी मार्ग :
हा बाह्य रिंगरोड तब्बल 65.1 किलोमीटर लांबीचा असणार असून तो शहरालगतच्या 25 गावांमधून जाणार आहे. या मार्गामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खासगी जमिनी थेट खरेदी करण्यासाठी जमीनमालकांची लेखी परवानगी अनिवार्य करण्यात आली असून यासाठी 15 फेब्रुवारी ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती.
दरम्यान, काही शेतकऱ्यांनी मुदत वाढवण्याची मागणी केली आहे. अनेक जमिनी वडिलोपार्जित किंवा संयुक्त नावे असल्याने अचूक क्षेत्रफळ आणि मालकी हक्क निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पोटहिस्से करूनच संमती आणि खरेदी प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुदतवाढीची विनंती केली असून प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.






