नाशिक हादरलं! 18 तास मृतदेह घरातच ठेवला, अन् कसारा घाटात फेकला; असा लागला तपास

On: August 18, 2026 12:30 PM
Nashik Crime
---Advertisement---

Nashik Crime | नाशिक (Nashik) येथून धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 40 वर्षीय वसंत गोरखनाथ सातपुते यांची त्यांच्या प्रेयसीने मित्राच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मृतदेह तब्बल 18 तास घरात ठेवण्यात आला आणि त्यानंतर कारमधून कसारा घाटात नेऊन फेकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत संशयितांना ताब्यात घेतले आहे.

घरात हत्या, 18 तासांनी मृतदेह घाटात फेकला :

मिळालेल्या माहितीनुसार, हसिना शेख (Hasina Sheikh) आणि वसंत गोरखनाथ सातपुते हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये काही कारणांवरून सातत्याने वाद होत असल्याचे तपासात समोर येत आहे. या वादातून हसिना हिने मित्र साहिल शहा (Sahil Shah) याच्या मदतीने सातपुते यांची घरातच गळा चिरून हत्या केल्याचा संशय आहे. हत्या झाल्यानंतर मृतदेह लगेच घराबाहेर काढण्यात आला नाही. तब्बल 18 तास तो घरातच ठेवण्यात आला आणि त्यानंतर कारमधून मृतदेह कसारा घाटाकडे नेण्यात आला. तेथे मृतदेह फेकून संशयित पुन्हा मुंबईच्या दिशेने गेले.

हत्येनंतर प्रकरण लपवण्याचा प्रयत्न झाल्याचेही तपासातून पुढे आले आहे. घरातील रक्ताचे डाग पुसण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर संशयित मुंबईत फिरत होते. या प्रकरणी सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल नसतानाही पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. हसिना शेख, तिचा मित्र साहिल शहा आणि त्यांच्या साथीदारांनी कारमधून मृतदेह नेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपासाला वेग आला. पोलिसांनी कसारा घाटात शोध घेत मृतदेहाचा शोध लावला आणि त्याची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली. मृत व्यक्ती वसंत गोरखनाथ सातपुते असल्याचे त्यानंतर स्पष्ट झाले.

Nashik Crime | वाद, पैशांची चोरी आणि व्यसनांचा आरोप :

पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हसिना शेख आणि साहिल शहा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मोईन शहा (Moin Shah) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आता पोलिसांकडून या तिघांची चौकशी केली जात असून हत्येमागील नेमके कारण, गुन्हा कशा पद्धतीने करण्यात आला आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा तपास सुरू आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, वसंत सातपुते हे हसिना यांच्याकडील पैसे वारंवार चोरत असल्याचा आरोप आहे. त्यांना मद्यपानाचे व्यसन होते, तसेच जुगार खेळण्याचीही सवय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या कारणांमुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. सातपुते हे हसिना यांना शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याने त्या त्रस्त झाल्या होत्या, असा प्राथमिक तपासाचा दावा आहे. त्यातूनच मित्राच्या मदतीने सातपुते यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

News title : Nashik Live In Murder Case Shocks City

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now