Nagar Parishad Elections | नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र शिंदे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बदलापूरमध्ये मतदानादिवशी मोठा गोंधळ उडाला. येथे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गांधी नगर टेकडी एसटी बसस्टँड परिसरात सकाळीच ही धक्कादायक घटना घडली. (Nagar Parishad Elections 2025)
मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदारांना स्लिप वाटणे आणि बुथ लावण्यावरून वाद निर्माण झाला. पाहता पाहता वाद वाढत गेला आणि राड्यात रूपांतर झाले. तसेच परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन जणांना ताब्यात घेतले असून परिसरात परिस्थिती नियंत्रणात आणली.
बदलापूरमध्ये मतदानाची उत्साहवर्धक सुरुवात, पण गोंधळामुळे तणाव :
बदलापूर नगरपालिकेच्या (Badlapur Clashes) निवडणुकांसाठी सकाळपासूनच मतदान सुरू झाले असून नगराध्यक्षपदासह 43 जागांसाठी मतदान होत आहे. शहरातील अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या रांगा लावत उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. गांधी चौकातील मराठी शाळा, एसटी बसस्टँड परिसर याठिकाणी सकाळीच गर्दी दिसून आली. (Nagar Parishad Elections 2025)
या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ उमेदवारांमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून वीणा म्हात्रे, भाजपकडून रुचिता घोरपडे, ठाकरे गटाकडून प्रिया गवळी, तसेच अपक्ष उमेदवार संगीता चेंदवणकर आणि आस्था मांजरेकर यांचा समावेश आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसते. मतदान शांततेत पार पडावे यासाठी सुरक्षेची विशेष उपाययोजना करण्यात आली असून तरीही राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Nagar Parishad Elections | राज्यातील इतर मतदान केंद्रांवरही गोंधळ :
राज्यातील अनेक ठिकाणी मतदान सुरळीत सुरू असले तरी काही भागांत गोंधळाची नोंद झाली. बुलढाण्यात बोगस मतदान करताना एका युवकाला पकडण्यात आले. मतदान प्रतिनिधींनी त्याला चोप देत मतदान केंद्रातून हुसकावून लावल्याने मोठा गोंधळ झाला. शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रात या घटनेने तणाव वाढला.
अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीतही अडचणी उद्भवल्या. येथील उर्दू शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 9 मधील EVM मशीन अर्ध्या तासाहून अधिक काळ बंद पडले. मशीन दुरुस्त करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असून मतदारांच्या रांगा वाढत आहेत. यामुळे सकाळच्या सत्रात मतदानासाठी आलेल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. (Nagar Parishad Elections 2025)
राज्यात 250 हून अधिक नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका होत असल्याने पक्ष विस्तार, नेतृत्व घडवणे आणि स्थानिक राजकारणातील सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. मात्र मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी निर्माण झालेला गोंधळ प्रशासनासमोर आव्हान निर्माण करत आहे.






