Election Date 2026 | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा करण्यात आली असून, राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यभर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. (Election Date 2026)
राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनुसार, राज्यातील एकूण २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी एकाच दिवशी मतदान होणार आहे. त्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक केंद्रस्थानी असली तरी इतर शहरांमध्येही चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.
राज्यातील कोणकोणत्या महापालिकांमध्ये होणार निवडणूक? :
या निवडणुकीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, मालेगाव, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाडा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या २९ महापालिकांचा समावेश आहे. या सर्व शहरांमध्ये स्थानिक सत्तेसाठी जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे.
विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या मोठ्या शहरांमध्ये कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांना ‘मिनी विधानसभा’ (Mini Vidhansabha) म्हणूनही पाहिले जात असून, आगामी राज्य राजकारणाची दिशा ठरवण्यात या निकालांचा मोठा प्रभाव राहणार आहे. (State Election Commission News)
Election Date 2026 | महापालिका निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम काय? :
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, इच्छुक उमेदवारांना २३ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून, २ जानेवारी २०२६ ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप ३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केले जाईल. (Maharashtra Election Date 2026)
दरम्यान, मतदार याद्यांतील घोळाबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर निवडणूक आयोगाने उपाययोजना जाहीर केल्या आहेत. दुबार नोंद असलेल्या मतदारांच्या नावासमोर डबल स्टार चिन्ह लावण्यात येणार असून, अशा मतदारांकडून मतदानाच्या वेळी योग्य केंद्राची खात्री केली जाणार आहे. यामुळे मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाईल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.






