मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! उद्या तब्ब्ल १३ तास ‘या’ भागातील वाहतूक वळवली जाणार

On: February 16, 2026 1:45 PM
Mumbai traffic update
---Advertisement---

Mumbai News | मुंबईत 17 फेब्रुवारी रोजी वाहतुकीत मोठे बदल लागू करण्यात येणार आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावर तब्बल 13 तास काही वाहनांसाठी प्रवेशबंदी राहणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हे निर्बंध मुंबई वाहतूक पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहेत.

मोदी–मॅक्रॉन दौऱ्यामुळे वाहतूक बदल :

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) मुंबई भेटीवर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) उपस्थित राहणार आहेत. दौऱ्यादरम्यान इंडो-फ्रेंच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला कार्यक्रम ताज हॉटेल (Taj Hotel) येथे होणार असून त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) परिसरात सांस्कृतिक सोहळा पार पडेल. त्यानंतर दोन्ही नेते लोकभवनात भेट देतील.

या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने संभाव्य गर्दी आणि ताफ्याच्या हालचाली लक्षात घेऊन मार्गांमध्ये बदल केले आहेत. कार्यक्रमानंतर दोन्ही नेते नवी दिल्लीकडे रवाना होणार असून तेथे एआय इम्पॅक्ट समिट 2026 (AI Impact Summit 2026) मध्ये सहभाग घेणार आहेत.

Mumbai News | कुठे आणि किती वेळ निर्बंध? :

मुंबई पोलिसांचे डीसीपी अजित बोऱ्हाडे (Ajit Borhade) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत पश्चिम द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. वाकोला उड्डाणपूल ते दहिसर टोल नाका या दरम्यान ही बंदी लागू असेल. मात्र रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या आपत्कालीन सेवांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

फ्रान्सचे राष्ट्रपती 16 ते 19 फेब्रुवारीदरम्यान भारत दौऱ्यावर असून मुंबई आणि नवी दिल्ली येथे विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने आयोजित शिखर परिषदेमुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील प्रवाशांनी 17 फेब्रुवारीला पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

News title : Mumbai Traffic Curbs for VIP Visit

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now