Ro-Ro boat service | मुंबई ते कोकण आणि गोवा दरम्यान जलद आणि सोयीस्कर प्रवासासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन रो-रो (Roll-on/Roll-off) बोट सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. या सेवेच्या माध्यमातून प्रवासी आणि त्यांची खासगी वाहने समुद्रमार्गे प्रवास करू शकतील. गणेशोत्सवाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा नवा पर्याय प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबई-कोकण रो-रो सेवेचा आराखडा
गणेशोत्सव (Ganeshotsav 2025), मे महिन्याच्या सुट्ट्या आणि मोठ्या सणांदरम्यान मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर येथून मोठ्या प्रमाणावर प्रवासी कोकणच्या दिशेने रवाना होतात. मात्र, रेल्वे आणि एसटी तिकीटांची मोठी मागणी आणि प्रचंड गर्दीमुळे अनेक प्रवाशांना प्रवास करणे कठीण होते. हीच समस्या सोडवण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभाग मंत्री नितेश राणे यांनी मुंबई-गोवा रो-रो सेवेची घोषणा केली आहे.
या सेवेअंतर्गत प्रवाशांना मुंबईतील माझगाव डॉक येथे बोटीत चढण्याची सुविधा उपलब्ध होईल. या सेवेचा पहिला थांबा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड किनाऱ्यावर असेल, जिथे अवघ्या साडेचार तासांत पोहोचता येईल. तसेच, ही सेवा पुढे गोव्यापर्यंत वाढवली जाणार असून, मुंबई-गोवा संपूर्ण प्रवासास साडेसहा तास लागणार आहे.
गणेशोत्सवात प्रवाशांना मोठा दिलासा
प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना आपल्या गावी पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ही नवीन रो-रो सेवा गणेशभक्तांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. हजारो भाविकांना या उपक्रमाचा लाभ होईल आणि कोकणातील प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी बनेल, असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य शासन लवकरच या सेवेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष काम सुरू करणार आहे. आता या नव्या रो-रो सेवेचा शुभारंभ यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Title : Mumbai to Goa Ro-Ro boat service to Start Soon






