BMC Health Advisory | मुंबईसह महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घर, रस्ते आणि कार्यालयात पोहोचताना लोकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. या साचलेल्या पाण्यातून आता नवे संकट उभे राहिले असून, मुंबईत लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (BMC Health Advisory)
गेल्या काही दिवसांत पावसामुळे साचलेल्या पाण्याचा आरोग्यावर थेट परिणाम दिसून येत आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये पावसाळी आजारांचे रुग्ण वाढले असून, मुंबई महापालिकेने याकडे गंभीरतेने लक्ष दिले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील विविध भागांत फवारणी मोहिमा सुरू केल्या आहेत.
पावसाळी आजारांचा वाढता धोका :
१ ते २० ऑगस्ट दरम्यान मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, गॅस्ट्रो आणि H1N1 रुग्णसंख्या वाढल्याचे समोर आले आहे. त्यातच साचलेल्या पाण्यातून चालणाऱ्यांना लेप्टोस्पायरोसिस या गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला आहे. लेप्टोस्पायरा नावाचे जंतू दूषित पाण्यातून शरीरात प्रवेश करतात. शरीरावर जखम असेल आणि पाण्याच्या संपर्कात आला तर संसर्गाची शक्यता जास्त आहे. वेळेवर उपचार न केल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष करू नये, असे बीएमसीने नागरिकांना आवाहन केले आहे.
यासाठी महापालिकेने मोफत तपासणी व उपचाराची सोय केली असून, नागरिकांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने, आरोग्य केंद्रे किंवा बीएमसी रुग्णालयांचा लाभ घेता येणार आहे. (BMC Health Advisory)
BMC Health Advisory | शून्य डास मोहीम आणि उपाययोजना :
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पावसाळी आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष बैठक घेतली. या बैठकीत “शून्य डास मोहीम” राबवण्याचे आदेश देण्यात आले. बांधकाम साईटवर एम.एल.ओ ऑईलची फवारणी, धूर फवारणी आणि कीटकनाशकांची फवारणी सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांना शक्यतो साचलेल्या पाण्यातून न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गरज असल्यास गमबूट वापरावेत, घरी आल्यावर पाय साबणाने धुवून स्वच्छ करावेत. साचलेल्या पाण्यातून गेल्यास २४ ते ७२ तासांत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच प्रतिबंधक औषधे बीएमसीच्या दवाखान्यांत मोफत उपलब्ध आहेत.
मुंबईकरांनी वेळीच सावधगिरी बाळगून स्वतःसह कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहन बीएमसीने केले आहे.






