मुसळधार पावसाने झोडपलं! ‘या’ भागांत रेड अलर्ट जारी, पुढील 3 तास नागरिकांना सतर्कतेचा इशारा

On: June 24, 2026 10:08 AM
---Advertisement---

Mumbai Rain Update | मान्सूनने गेल्या काही तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई परिसराला अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान खात्याने मंगळवारी मुंबईत मान्सूनचे अधिकृत आगमन झाल्याची घोषणा केल्यानंतर रात्रीपासूनच पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली असून सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुंबई आणि पालघरमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’; अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई महानगरपालिकेने (BMC) पुढील काही तासांसाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. त्यानुसार मुंबई आणि पालघर परिसरात पुढील ३ तासांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह ४० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पुढील ३ तासांकरिता ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.

रेल्वे वाहतूक मंदावली; ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे रुळांखालील माती वाहून गेली
पावसामुळे मुंबईतील चाकरमान्यांचे अतोनात हाल होत असून कामावर जाणाऱ्या नागरिकांना प्रवासाचा मोठा फटका बसला आहे:

मध्य आणि पश्चिम रेल्वे: रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे दोन्ही मार्गांवरील लोकल ट्रेन सध्या १५ ते २० मिनिटे वििलांबाने आणि धीम्या गतीने धावत आहेत.

वाशी – ठाणे ट्रान्सहार्बर सेवा ठप्प: मुसळधार पावसामुळे कोपरखैरणे ते घणसोली दरम्यान रेल्वे ट्रॅकखालील माती वाहून गेल्याने ट्रान्सहार्बर रेल्वे सेवा सुमारे ४५ मिनिटांसाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, पावसाचा जोर ओसरल्यानंतर युद्धपातळीवर काम करून अप लाईन सकाळी ७:२७ वाजता आणि डाऊन लाईन ७:३५ वाजता पुन्हा सुरू करण्यात आली. सध्या या मार्गावर वेगाची मर्यादा (Speed Limit) देऊन गाड्या चालवल्या जात आहेत.

अंधेरी सबवे बंद; दादर आणि माटुंग्यात पाणी साचले
महानगरातील वाहतूक व्यवस्थेवरही या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. पश्चिम उपनगरातील महत्त्वाचा दुवा असलेला अंहेरी सबवे ३ ते ४ फूट पाण्याखाली गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी वाहनधारकांना पर्यायी मार्ग म्हणून गोखले पुलाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

याव्यतिरिक्त, दक्षिण मुंबईतील सखल भाग, दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. दादर पूर्वेकडील स्वामीनारायण मंदिराजवळ एक मोठे झाड कोसळल्याची घटनाही समोर आली आहे.

कोकण किनारपट्टीवर रेड आणि ऑरेंज अलर्टचा इशारा

हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे:

रत्नागिरी – रेड अलर्ट (अतिवृष्टीचा इशारा) – उद्या ऑरेंज अलर्ट, त्यानंतर पुढील ३ दिवस यलो अलर्ट

रायगड – ऑरेंज अलर्ट – उद्यापासून पुढील ४ दिवस यलो अलर्ट

सिंधुदुर्ग -उद्या यलो अलर्ट, त्यानंतर पुढील २ दिवस ऑरेंज अलर्ट

News Title: Mumbai Rain Updates Local Train Disrupted Orange Alert

Join WhatsApp Group

Join Now