Dahi Handi & Ganeshotsav | येत्या दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. ड्रोन, रिमोट कंट्रोल यंत्रणा, मायक्रो-लाइट विमान, पॅराग्लायडर, पॅरामोटर, हँडग्लायडर, हॉट एअर बलून आदी सर्व हवाई उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत लागू राहणार आहे.
हवाई उपकरणांवर बंदी का घालण्यात आली आहे? :
पोलिस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी ही माहिती दिली असून, शहरात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दहशतवादी आणि विघातक कारवाया रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. (Dahi Handi & Ganeshotsav)
दहीहंडी आणि गणेशोत्सव हे मुंबईतील दोन अत्यंत गाजणारे आणि लोक सहभाग असलेले उत्सव आहेत. या काळात मुंबई आणि उपनगरांमध्ये प्रचंड गर्दी होते. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, देशविरोधी तत्त्वे किंवा दहशतवादी गट गर्दीचा फायदा घेऊन ड्रोनसारख्या आधुनिक हवाई साधनांचा वापर करू शकतात. त्यामुळे, नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत ही बंदी लागू करण्यात आली आहे.
Dahi Handi & Ganeshotsav | कोणाला सूट मिळणार आणि कोणाला नाही? :
या बंदी आदेशामध्ये काही विशिष्ट अपवाद ठेवण्यात आले आहेत:
– मुंबई पोलिसांची हवाई पाळत (Aerial Surveillance)
– पोलिस उपायुक्त (अभियान) यांची लेखी परवानगी असलेली कारवाई
याशिवाय कोणत्याही खाजगी व्यक्ती, संस्था, मीडियाला किंवा व्यावसायिक यंत्रणेला या कालावधीत वरील उपकरणांचा वापर करता येणार नाही. (Dahi Handi & Ganeshotsav)
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार :
पोलिसांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणतीही शिथिलता दाखवली जाणार नाही. नागरिकांनी, आयोजकांनी आणि व्यावसायिकांनी याची गंभीर दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






