Mumbai Monsoon Accidents | मुंबईत (Mumbai) सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी चेंबूर (Chembur) येथे शालेय बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर, आता साकीनाका (Sakinaka) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, या दुर्घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काही आठवड्यांपूर्वीच मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawade) यांनी रस्ते आणि नाल्यांची पाहणी केली होती, मात्र त्यानंतरही अशा घटना घडत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मोबाईलवर बोलताना मॅनहोलमध्ये पडला आणि पाण्याचा वेग नडला
ही घटना कुर्ला (Kurla) खैरानी रोडवरील (Khairani Road) सन्मान हॉटेलजवळ (Sanman Hotel) घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक व्यक्ती मोबाईलवर बोलत चालली असताना तिचे लक्ष गेले नाही आणि ती थेट २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये कोसळली. या परिसरात एका खाजगी कंत्राटदाराकडून देखभालीचे काम सुरू असल्यामुळे हे मॅनहोल उघडे ठेवण्यात आले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल (MFB), स्थानिक पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. शोध मोहिमेदरम्यान त्या व्यक्तीची छत्री आणि चप्पल सापडली. मात्र, पावसाच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने ती व्यक्ती वाहून गेल्याची भीती सुरुवातीलाच व्यक्त करण्यात आली होती.
आमदारांकडून मृत्यूची पुष्टी आणि प्रशासनाविरोधात जनक्षोभ
या घटनेबाबत स्थानिक आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांनी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद माहिती दिली. मॅनहोलमध्ये पडलेल्या त्या दुर्दैवी व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अन्सारी (Ansari) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मॅनहोलमधील पाण्याचा प्रचंड वेग पाहता त्यांच्या वाचण्याची शक्यता आधीच खूप कमी वर्तवली जात होती.
अन्सारी यांच्या मृत्यूची बातमी समजताच मुंबईकरांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेकडून पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी आणि नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, ‘पाण्यासारखा पैसा खर्च करूनही’ सर्वसामान्य नागरिकांचे जीव असे उघड्या मॅनहोलमुळे धोक्यात येत असल्याने पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका केली जात आहे.
News Title: Mumbai Monsoon Accidents Sakinaka Manhole Fatality Man Dies Kurla Khairani Road






