Mumbai | मुंबईकरांच्या उपनगरी प्रवासाला आता ‘गारेगार’ अनुभव मिळणार आहे. लोकल डब्यांमध्ये मेट्रोसारखी वातानुकूलित (AC) सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून, या नव्या सेवेमुळे प्रवाशांवर कोणतीही भाडेवाढ लादली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. (Mumbai local AC trains)
लोकलचे डबे होतील अत्याधुनिक, दरवाजेही आपोआप बंद होणार :
मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, “अपघाताचं मुख्य कारण म्हणजे लोकलमध्ये दरवाजे सतत खुले राहतात. मेट्रोमध्ये असलेल्या बंद दरवाज्यांमुळे सुरक्षा वाढते. त्यामुळे लोकलमध्येही अशीच आधुनिक व्यवस्था लागू करणार आहोत.”
ते पुढे म्हणाले, “हे नवीन डबे असतील, पूर्णपणे एसी आणि दरवाजे आपोआप बंद होणारी सुविधा असलेले. त्यासाठी प्रवाशांकडून कोणताही अतिरिक्त पैसा घेतला जाणार नाही. भाडेवाढ शून्य आहे.”
Mumbai | एकाच तिकिटात सर्व प्रवास शक्य! :
फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली की, सध्या एकात्मिक तिकीट प्रणाली विकसित केली जात आहे. या प्रणालीत एकाच तिकिटावर मेट्रो, लोकल, मोनोरेल, बेस्ट बस आणि जलवाहतुकीचा लाभ घेता येणार आहे. चाचणी टप्प्यात असलेली ही योजना यशस्वी झाल्यावर हे तिकिट WhatsApp वरही उपलब्ध होणार आहे.
मिश्कील अंदाजात त्यांनी म्हटलं, “तिकिट व्हॉट्सॲपवर मिळणार असलं तरी निवडणुकीचं तिकिट मात्र तिथे मिळणार नाही!” (Mumbai local AC trains)






