Mumbai Coastal Road | मुंबईच्या कोस्टल रोड बोगद्यात बुधवारी दुपारी धावत्या कारला अचानक आग लागली. आगीमुळे बोगद्यात धूर पसरल्याने वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. अनेकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांना यू-टर्न देत बोगद्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. बोगद्यातून जात असलेल्या एका कारमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच वाहनाला आग लागली. याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ कोस्टल रोड बोगद्यातील वाहतूक थांबवण्यात आली.
प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
या घटनेवेळी बोगद्यात उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये अनेक लोक धावत बाहेर येताना दिसत आहेत.
पोस्टमध्ये त्याने लिहिले, “असा अनुभव मला यापूर्वी कधीच आला नव्हता. आम्ही वरळीच्या बाजूने कोस्टल रोड टनेलमध्ये प्रवेश केला आणि काही मिनिटांतच शेकडो लोक आमच्या दिशेने धावताना दिसले. मी एका व्यक्तीला काय झाले असे विचारले असता तो फक्त एवढेच म्हणाला, ‘पुढे आग लागली आहे.'”
I have never experienced anything like it. Entered the Coastal Road tunnel from Worli and in a couple of minutes saw 100s of people running towards us. Asked one person and he said “aage aag lagi hai”.
I’m not sure what was on fire or if there even was one, but many people just… pic.twitter.com/W3vnWb1g41
— Shaunak Modi (@Pugdandee) July 15, 2026
अग्निशमन दलाची माहिती
मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याची माहिती मिळताच पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि काही वेळातच आग पूर्णपणे विझवण्यात आली. या घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.
मुंबई कोस्टल रोड हा दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स ते कांदिवलीदरम्यान उभारला जात असलेला महत्त्वाकांक्षी मार्ग असून, त्यातील समुद्राखालील बोगदा हा भारतातील पहिला अशा प्रकारचा बोगदा मानला जातो. या घटनेनंतर बोगद्यातील सुरक्षाव्यवस्थेबाबतही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
News Title: Mumbai Coastal Road Tunnel Fire Vehicle Panic






