घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये! ठाकरेंचा वचननामा जाहीर

On: January 4, 2026 2:55 PM
Mumbai Municipal Election 2026
---Advertisement---

Mumbai Municipal Election 2026 | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय इतिहासातील महत्त्वाचा क्षण पाहायला मिळाला. जवळपास २० वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात एकत्र आले. या वेळी मनसे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा संयुक्त ‘शिवशक्ती’ वचननामा अधिकृतपणे जाहीर करण्यात आला.

या वचननाम्यात सामान्य मुंबईकर, महिला, कष्टकरी वर्ग, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्त्वाची आश्वासने देण्यात आली असून, विशेषतः घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक मदतीची घोषणा चर्चेचा विषय ठरली आहे.

महिलांसाठी थेट आर्थिक मदत आणि स्वस्त जेवण :

संयुक्त वचननाम्यानुसार, घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करण्यात येणार असून नोंदणीकृत महिलांना दरमहा १५०० रुपयांचा ‘स्वाभिमान निधी’ दिला जाणार आहे. यासोबतच केवळ १० रुपयांत जेवण आणि नाश्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. (Mumbai Municipal Election 2026)

नोकरदार पालक आणि कष्टकरी महिलांसाठी पाळणाघरांची व्यवस्था करण्यात येणार असून, महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी बेस्ट बसमधून मोफत प्रवासाची घोषणाही या वचननाम्यात करण्यात आली आहे.

Mumbai Municipal Election 2026 | घरपट्टी, कर आणि नागरी सुविधा :

मुंबईकरांसाठी ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्यात येणार असून, कचरा कर पूर्णपणे रद्द करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. पाण्याचे दर स्थिर ठेवून सर्वांना पाणीपुरवठा केला जाईल, असंही नमूद करण्यात आलं आहे.

महापालिकेच्या पार्किंगमध्ये मोफत पार्किंग सुविधा, खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास आणि फुटपाथ तसेच मोकळ्या जागा नागरिकांसाठी खुल्या ठेवण्याचा शब्दही देण्यात आला आहे.

शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा :

महापालिकेच्या शाळांमध्ये दहावीनंतर बारावीपर्यंत ज्युनियर कॉलेज सुरू करण्यात येणार असून, मुंबई पब्लिक स्कूलचा दर्जा अत्याधुनिक केला जाणार आहे. मराठी शाळांमध्ये ‘बोलतो मराठी’ हा डिजिटल उपक्रम सुरू करून खेळत-खेळत मराठी शिकवण्यावर भर देण्यात येणार आहे. (Mumbai Municipal Election 2026)

आरोग्य क्षेत्रात मुंबईत सुपर स्पेशालिस्ट कॅन्सर रुग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंट अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक वार्डात पाळीव प्राण्यांसाठी दवाखाना आणि मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचाही समावेश वचननाम्यात आहे.

मुंबईसाठी मोठे प्रकल्प :

सांडपाणी प्रक्रिया करणारे मलनिसारण प्रकल्प, समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात रूपांतरित करण्याचे प्रकल्प आणि १२ महिने नालेसफाई प्रक्रिया राबवण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. उत्तम दर्जाचे रस्ते बांधून कंत्राटदारांकडून १५ वर्षांची हमी घेतली जाईल, असंही वचननाम्यात नमूद आहे. (Shivshakti Vachannama)

मुंबईतील नागरिकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा मोठा शब्द देण्यात आला असून, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मुंबई महापालिकेतर्फे सर्वात मोठं ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. (Thackeray Manifesto)

२० वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकत्र :

या संयुक्त वचननाम्याच्या प्रकाशनामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जवळपास दोन दशकांनंतर शिवसेना भवनात एकत्र आले आहेत. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आता सभा, पत्रकार परिषद, मुलाखती आणि वचननामा सर्व काही संयुक्त पद्धतीने होणार आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी याआधीच वचननाम्यावर सविस्तर चर्चा केली होती आणि आज त्याचं अधिकृत प्रकाशन करण्यात आलं.

News Title: Mumbai Civic Polls 2026: ₹1500 Aid for Homemakers, ₹10 Meals Promised in Joint Thackeray Manifesto

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now