मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नका; पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे

On: January 4, 2026 11:19 AM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कडाक्याच्या थंडीनंतर वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचदरम्यान वाढते वायू प्रदूषण हा गंभीर चिंतेचा विषय ठरत असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

उत्तर भारतातून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रातही गारठा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील २४ तास राज्यासाठी धोक्याचे ठरू शकतात, असा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. थंडीबरोबरच ढगाळ वातावरण आणि काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात थंडीची लाट, तापमानात मोठी घट :

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस राज्यात थंडीची तीव्रता वाढणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे तापमानात झपाट्याने घट होत असून अनेक ठिकाणी किमान तापमान नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी अधिक तीव्र जाणवत आहे. (Cold Wave Warning)

जळगाव येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून येथे ९.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ धुळे येथे ९.६ अंश तर जेऊर येथे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या घसरणाऱ्या तापमानामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

Maharashtra Weather Update | मुंबईत वायू प्रदूषणाचा कहर, आरोग्यावर परिणाम :

मुंबईत वायू प्रदूषणाचा स्तर चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. काल रात्री मुंबईच्या अनेक भागांत प्रचंड धूळ आणि धुराचे साम्राज्य पाहायला मिळाले. आकाशात स्पष्टपणे काहीही दिसत नव्हते, अशी स्थिती निर्माण झाली होती. या वाढत्या प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ आणि घसा दुखणे अशा समस्या वाढत आहेत.

सतत बदलणारे हवामान आणि प्रदूषणामुळे सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचे विकार आणि गळ्यात दुखणे यांसारख्या आजारांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

मास्क वापरण्याचा सल्ला, दाट धुक्याचा इशारा :

वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः ज्यांना दमा किंवा इतर श्वसनाचे आजार आहेत, त्यांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Air Pollution Alert)

दरम्यान, उत्तर भारतातही थंडीचा कहर वाढत असून दिल्ली-एनसीआरमध्ये तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून सकाळच्या वेळेत दाट धुक्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

News Title: Dangerous Air Quality Alert in Maharashtra: Cold Wave and Pollution Threat for Next 24 Hours

Maharashtra Weather Update, Air Pollution Alert, Cold Wave Warning, IMD Warning, Mumbai Air Pollution
महाराष्ट्र हवामान अपडेट, वायू प्रदूषण इशारा, थंडीची लाट, हवामान विभागाचा इशारा, मुंबई वायू प्रदूषण

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now