Numerology | अंकशास्त्रनुसार व्यक्तीच्या जन्मतारखेवरून तिच्या स्वभावाची, विचारसरणीची आणि काही विशेष गुणांची माहिती मिळू शकते. विशेषतः मूलांक 7 असलेल्या व्यक्तींमध्ये तीव्र अंतर्ज्ञान असल्याचे मानले जाते. त्यामुळे अशा लोकांना समोरच्या व्यक्तीच्या भावना, हेतू आणि वागणुकीचा अंदाज पटकन येतो, असे अंकज्योतिषात सांगितले जाते.
मूलांक 7 असलेल्या व्यक्तींचे विशेष गुण :
अंकज्योतिषानुसार कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 मानला जातो. या मूलांकाचा अधिपती ग्रह केतू (Ketu) असल्याचे मानले जाते. केतूचा संबंध अध्यात्म, गूढ विषय आणि सूक्ष्म निरीक्षणाशी जोडला जातो. त्यामुळे या मूलांकाच्या व्यक्तींची विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असल्याचे मानले जाते. कोणतीही गोष्ट वरवर न पाहता तिच्या मुळापर्यंत जाऊन समजून घेण्याचा त्यांचा स्वभाव असतो.
मूलांक 7 असलेल्या लोकांमध्ये अंतर्ज्ञानाची क्षमता अधिक प्रभावी असल्याचे अंकशास्त्रात नमूद केले जाते. त्यामुळे समोरची व्यक्ती प्रामाणिक आहे की काहीतरी लपवत आहे, याचा अंदाज त्यांना सहज येऊ शकतो. अनेकदा कोणताही ठोस पुरावा नसतानाही योग्य-अयोग्य याबाबत त्यांची मनातील भावना अचूक ठरते, असा विश्वास व्यक्त केला जातो. त्यामुळे अशा व्यक्तींना फसवणे किंवा खोटे बोलून दिशाभूल करणे सोपे नसते.
Numerology | निरीक्षणशक्ती आणि अध्यात्माकडे विशेष ओढ :
या जन्मतारखांच्या व्यक्ती इतरांच्या बोलण्याइतकेच त्यांच्या वागण्या-बोलण्याची शैली, देहबोली आणि स्वभावाचे बारकाईने निरीक्षण करतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा खरा उद्देश त्यांना लवकर लक्षात येतो. अनेक जण त्यांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवतात, कारण त्यांनी केलेले अंदाज अनेकदा योग्य ठरतात. मात्र, तीक्ष्ण निरीक्षणशक्तीसोबतच हे लोक संवेदनशील आणि भावनिक स्वभावाचेही असतात.
अंकज्योतिषानुसार मूलांक 7 असलेल्या व्यक्तींना अध्यात्म, गूढ विषय, संशोधन आणि रहस्यमय गोष्टींबद्दल विशेष आकर्षण असते. गर्दीपेक्षा एकांतात वेळ घालवणे त्यांना अधिक आवडते, त्यामुळे अनेकजण त्यांना अंतर्मुख समजतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ते सर्व बाजूंनी विचार करतात आणि घाई टाळतात. संशोधन, लेखन, अध्यापन, सर्जनशील क्षेत्र तसेच अध्यात्माशी संबंधित कामांमध्ये ते विशेष प्रगती करू शकतात, असे अंकशास्त्रात सांगितले जाते.






