Pune News | पुणे शहरातील भाविक आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. स्वारगेट बस आगाराकडून राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सेवा भाविकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार असून, आता थेट पुण्यातून विविध धार्मिक स्थळांना सहज जाता येणार आहे. (Swargate MSRTC bus service)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने ५ ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, अक्कलकोट-तुळजापूर-गाणगापूर आणि रायगड या ठिकाणी जाणाऱ्या विशेष सहली जाहीर करण्यात आल्या आहेत. या सेवेसाठी निम-आराम बस उपलब्ध करून देण्यात येणार असून ठराविक तारखांनुसार या सहली सुरू होतील.
पाच ज्योतिर्लिंगांसाठी ३ दिवसांची सहल :
१९ ते २१ जुलै २०२५ दरम्यान तीन दिवसांची विशेष सहल आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये भीमाशंकर (पुणे), त्र्यंबकेश्वर (नाशिक), घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर), परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ (हिंगोली) या पाच ज्योतिर्लिंग स्थळांना भेट दिली जाणार आहे. भाविकांना एकाच सहलीत ही पवित्र स्थळं पाहण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.
या सेवेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि धार्मिक पर्यटन करणाऱ्या नागरिकांना प्रवास सुलभ होणार आहे. यासाठी आरक्षणाची सोयही स्वारगेट डेपोमध्ये करण्यात आली असून ऑनलाईन बुकिंगची सुविधाही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (Swargate MSRTC bus service)
Pune News | अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर आणि रायगडसाठीही योजना :
२२ व २३ जुलै रोजी दोन दिवसांची विशेष सहल अक्कलकोट, तुळजापूर आणि गाणगापूर या दक्षिण महाराष्ट्रातील श्रद्धास्थळांसाठी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच ३० जुलै रोजी रायगड किल्ल्याला एकदिवसीय सहल देखील स्वारगेट बस आगारातून आयोजित केली जाणार आहे. (Pune News)
या सर्व सहलींसाठी बस सकाळच्या वेळेत निघणार असून वेळापत्रक व प्रवास दर लवकरच जाहीर होणार आहेत. त्याचप्रमाणे २५ आणि २६ जुलै रोजी अष्टविनायक दर्शन यात्रा आयोजित केली जाणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील आठ गणपती मंदिरांना भेट देता येईल.






