SRPF Recruitment 2026 | राज्यातील तरुणांसाठी संरक्षण सेवेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. SRPF मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर उमेदवार दाखल झाले आहेत. 291 पदांसाठी तब्बल 75 हजार उमेदवार मैदानात उतरल्याने या भरतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांची सोय लक्षात घेऊन प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. कॅम्पमध्येच राहण्याची आणि जेवणाची निशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतची माहिती SRPF गट क्रमांक 14 चे कमांडंट विक्रम साली यांनी दिली.
291 पदांसाठी मोठी स्पर्धा :
SRPF मधील 291 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही पदे वरणगाव येथे स्थापन होणाऱ्या SRPF च्या नवीन गटासाठी भरली जाणार आहेत. या भरतीसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर अर्ज आले असून एकूण 75 हजार उमेदवारांनी अर्ज केला आहे. (SRPF Recruitment 2026)
उमेदवारांची मोठी संख्या लक्षात घेता दररोज सुमारे 2000 उमेदवारांना चाचणीसाठी बोलावले जात आहे. उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून पाणी, ओआरएस, फळे आणि बिस्किटे यांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
SRPF Recruitment 2026 | सकाळी 4 वाजता रनिंगची चाचणी :
भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीला विशेष महत्त्व आहे. उमेदवारांची 100 मीटर धाव आणि 5 किलोमीटर रनिंग चाचणी सकाळी 4 वाजल्यापासून सुरू केली जाते. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन लवकर चाचण्या घेतल्या जात आहेत. (Chhatrapati Sambhajinagar SRPF Recruitment)
याशिवाय उमेदवारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मेडिकल टीम देखील उपलब्ध ठेवण्यात आली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेची मदत घेऊन रात्री उशिरा येणाऱ्या उमेदवारांसाठी वाहनांची सोयही करण्यात आली आहे.
7 मेपर्यंत भरती प्रक्रिया सुरू :
ही भरती प्रक्रिया 7 मेपर्यंत सुरू राहणार आहे. इंजिनिअरिंग, बीएससी अॅग्रीकल्चर, बी-फार्मा यांसारख्या विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. (SRPF Bharti Maharashtra)
मोठ्या प्रमाणावर तरुण या भरतीत सहभागी होत असल्याने राज्यातील रोजगाराच्या संधींबाबतही सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.






