Dharashiv News | धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी धाराशिव ज़िल्हा परिषदने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वाढता स्क्रीन टाईम आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याची चिंता व्यक्त करत प्रशासनाने विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात दररोज रात्री 7 ते 9 या वेळेत टीव्ही बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील (Archana Patil) यांनी जाहीर केला असून विद्यार्थ्यांनी या दोन तासांमध्ये मोबाईल, टीव्ही आणि इतर डिजिटल साधनांपासून दूर राहून केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असा उद्देश या उपक्रमामागे आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनीही या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
‘भोंगा’ वाजताच टीव्ही बंद :
या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने खास योजना तयार केली आहे. रात्री नेमके 7 वाजता गावागावातील मंदिर किंवा ग्रामपंचायत इमारतीवर बसवलेल्या भोंग्यांमधून सिग्नल दिला जाईल. हा भोंगा वाजताच घरातील टीव्ही बंद करून विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसायचे आहे.
यासाठी गावपातळीवर विशेष पथकेही तयार करण्यात येणार आहेत. जसे पूर्वी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘गुड मॉर्निंग पथक’ कार्यरत होते, त्याच धर्तीवर आता शिक्षण निरीक्षक आणि ग्रामस्तरीय अधिकारी रात्री 7 ते 9 दरम्यान गस्त घालतील. घराघरात टीव्ही बंद आहे का आणि विद्यार्थी अभ्यास करत आहेत का, याची तपासणी हे पथक करणार आहे.
Dharashiv News | विद्यार्थ्यांसाठी स्टडी रूम आणि शिक्षकांची मदत :
विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळावे यासाठी प्रशासनाने आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात अभ्यास करता येणार आहे.
तसेच शाळा सुटल्यानंतर अभ्यासात अडचण येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा आणि इतर शैक्षणिक परीक्षांमधील कामगिरी सुधारावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पालकांना सहकार्याचे आवाहन :
जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी पालकांना विशेष आवाहन केले आहे. “मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी दोन तास टीव्हीचा त्याग करणे आवश्यक आहे. हे केवळ प्रशासनाचे काम नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.
या निर्णयाचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत होत असले तरी घराघरात टीव्ही बंद करण्याच्या या उपक्रमाला नागरिकांचा किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






