CSK च्या गोटात मोठा जल्लोष! पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नईला मिळाली गूड न्यूज; पाहा नक्की काय घडलं?

On: April 2, 2026 8:44 PM
CSK
---Advertisement---

Chennai Super Kings | आयपीएल 2026 स्पर्धेची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ससाठी निराशाजनक ठरली आहे. सलामीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. नव्या हंगामात संघ अधिक मजबूत करण्यासाठी चेन्नईने काही महत्त्वाचे बदल केले होते, मात्र पहिल्याच सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुढील सामन्यांमध्ये संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) पुढील सामना पंजाब किंग्सविरुद्ध (PBKS) होणार आहे. या सामन्यापूर्वी संघाच्या गोटातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी नेटमध्ये सराव करताना दिसला आहे. त्यामुळे सीएसके चाहत्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.

धोनीच्या दुखापतीनंतर मोठा दिलासा :

आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे तो सुरुवातीचे दोन आठवडे खेळणार नसल्याचं सांगितलं जात होतं. चेन्नई सुपर किंग्सनेही त्याच्या दुखापतीची माहिती देत चाहत्यांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. मात्र पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनी नेटमध्ये सराव करताना दिसल्याने चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

धोनीची सराव करतानाची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तो लवकरच मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तो पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Chennai Super Kings | पंजाबविरुद्धच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष :

धोनीला संघात स्थान मिळाल्यास तो ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात उतरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण संघात विकेटकीपिंगसाठी संजू सॅमसनचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे धोनीचा वापर फलंदाज म्हणून करण्याची रणनीती सीएसके आखू शकते.

दरम्यान, मागील आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. 2025 च्या स्पर्धेत संघ गुणतालिकेत 10व्या स्थानावर राहिला होता. त्यामुळे यंदा संघाने नव्याने बांधणी करत पुन्हा दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पहिल्या सामन्यात राजस्थानविरुद्ध फक्त 127 धावा करून चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानने हे आव्हान अवघ्या 13 षटकांत पूर्ण केले.

आता पंजाब किंग्सविरुद्धचा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होणार आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेत पुनरागमन करण्याचा सीएसकेचा प्रयत्न असेल. त्यात धोनी मैदानात उतरला तर चाहत्यांसाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण ठरू शकतो.

News Title: MS Dhoni Spotted Practicing Before CSK vs Punjab Match in IPL 2026, Big Boost for Chennai Super Kings

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now