Monsoon Update | राज्यात जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार पुनरागमन करत अनेक जिल्ह्यांना चांगलाच दिलासा दिला. या पावसामुळे जूनमधील तूटही मोठ्या प्रमाणात भरून निघाली. मात्र आता पुन्हा एकदा मान्सूनचा वेग मंदावल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, प्रशांत महासागरात सक्रिय होत असलेल्या ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
19 जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 10 जुलै ते 15 जुलैदरम्यान उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतासह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटू शकते. अरबी समुद्रातील आणि उत्तर भारतातील कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाल्याने ढगांची निर्मिती कमी झाली असून, ही स्थिती 19 जुलैपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे.
यामुळे मुंबई आणि कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र उर्वरित महाराष्ट्रात पावसाऐवजी उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबईत अवघ्या पाच दिवसांत विक्रमी पाऊस
मुंबईत जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र जुलैच्या पहिल्या पाच दिवसांतच पावसाने जोरदार हजेरी लावत संपूर्ण महिन्याच्या सरासरीपेक्षाही अधिक पाऊस नोंदवला. सांताक्रूझ वेधशाळेत 899.2 मिमी पाऊस नोंदवला गेला, जो सरासरीपेक्षा 5.1 टक्के अधिक आहे. तर कुलाबा वेधशाळेत 823.4 मिमी पावसाची नोंद झाली असून तो सरासरीपेक्षा 12.2 टक्के अधिक आहे.
‘अल निनो’मुळे मान्सूनचा बदललेला पॅटर्न
तज्ज्ञांच्या मते, ‘अल निनो’च्या प्रभावामुळे मान्सून सलग पडण्याऐवजी टप्प्याटप्प्याने सक्रिय होतो. काही दिवस अतिवृष्टी होते, तर त्यानंतर अनेक दिवस पावसाची विश्रांती आणि उष्णतेचा प्रभाव जाणवतो. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विदर्भात 18 टक्के पावसाची तूट
विदर्भात यंदाच्या पावसाळ्याची सुरुवात चांगली झाली होती. मात्र जुलैमध्ये पावसाने उघडीप दिल्याने अनेक भागांत अवर्षणाचे सावट निर्माण झाले आहे. 1 जून ते 10 जुलै या कालावधीत विदर्भात सरासरीच्या तुलनेत 18 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.
जिल्हानिहाय आकडेवारीनुसार गोंदिया जिल्ह्यात 34 टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर बुलढाणा आणि वर्धा येथेही सरासरीपेक्षा किंचित अधिक पाऊस नोंदवला गेला. मात्र गडचिरोलीमध्ये 46 टक्के, भंडाऱ्यात 33 टक्के, वाशीममध्ये 26 टक्के, चंद्रपूरमध्ये 23 टक्के, अमरावतीमध्ये 12 टक्के, नागपूर आणि अकोल्यात प्रत्येकी 10 टक्के तसेच यवतमाळमध्ये 7 टक्के पावसाची तूट आहे.
खरीप पिकांसमोर वाढली चिंता
नागपूर जिल्ह्यात 1 जून ते 9 जुलैदरम्यान 237.2 मिमी पाऊस झाला असून या कालावधीतील सरासरी 263.9 मिमी आहे. म्हणजेच जिल्ह्यात सुमारे 10 टक्के पावसाची तूट आहे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर खरीप पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष पुढील मान्सूनच्या सक्रिय टप्प्याकडे लागले आहे.
News Title: Monsoon Update El Nino Impact Vidarbha Rainfall Maharashtra








