Monsoon Update | राज्यात मान्सूनने पुन्हा गती घेतल्याने अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी लागली आहे. काही ठिकाणी पेरणीची कामे वेगाने सुरू झाली असली तरी काही भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी 25 जून ते 10 जुलै या कालावधीसंदर्भात महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला असून शेतकऱ्यांना दिलासादायक माहिती दिली आहे.
25 जून ते 10 जुलैदरम्यान पावसाची स्थिती :
पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांच्या मते, 25 जूनपासून 10 जुलैपर्यंत राज्यातील विविध भागांत पावसाची नोंद होणार आहे. मात्र हा पाऊस एकाच वेळी सर्वत्र होणार नसून टप्प्याटप्प्याने आणि विखुरलेल्या स्वरूपात बरसणार आहे. कोकण किनारपट्टीपासून मुंबईपर्यंतच्या परिसरात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा (Satara), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), सोलापूर (Solapur), बीड (Beed) आणि धाराशीव (Dharashiv) जिल्ह्यांमध्ये 25 जूनपासून हलक्या सरींची सुरुवात होईल. त्यानंतर 26 जून ते 10 जुलैदरम्यान या भागात नियमित स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांची पेरणीची कामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Monsoon Update | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला :
विदर्भ (Vidarbha) भागातही काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची हजेरी लागणार असल्याचे डख यांनी नमूद केले. मराठवाडा (Marathwada) विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला असला तरी अनेक गावांमध्ये अद्याप पुरेशा सरी पडलेल्या नाहीत. अशा भागांमध्येही येत्या काही दिवसांत पाऊस पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार (Nandurbar), धुळे (Dhule), अहिल्यानगर (Ahilyanagar), जळगाव (Jalgaon) आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यांमध्ये पुढील दहा दिवसांत आणखी पाऊस पडेल. त्यामुळे ओढे-नाले वाहू लागतील आणि पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होईल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता प्रथम जमिनीत पुरेशी ओल आहे का याची खात्री करावी आणि त्यानंतरच निर्णय घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
डख यांच्या मते, राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नाही. जुलै महिन्यात पावसाचा जोर अधिक राहू शकतो. तसेच ऑगस्टमध्ये दोन मोठ्या पावसाच्या घटना घडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊसही चांगल्या प्रमाणात पडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला. याशिवाय 13 नोव्हेंबरपासून राज्यात थंडीची चाहूल लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.






