Modi Iran President Call | अमेरिका आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या तणावपूर्ण परिस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि इराणचे (Iran) राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान (Masoud Pezeshkian) यांच्यात शनिवारी टेलिफोनवर महत्त्वाची चर्चा पार पडली. यावेळी मोदींनी नवरोज आणि ईदच्या शुभेच्छा देतानाच पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला, तर पेझेशकियान यांनी युद्धबंदीसाठी एक प्रमुख अट मांडली आहे.
युद्धाबाबत इराणची भूमिका आणि अट
इराणी दूतावासाच्या माहितीनुसार, या चर्चेत अमेरिका आणि इस्रायल कडून इराणवर सुरू असलेल्या लष्करी कारवायांवर चर्चा झाली. पेझेशकियान यांनी स्पष्ट केले की, या संघर्षाची सुरुवात इराणने केलेली नाही. त्यांनी असा दावा केला की, कोणतेही वैध कारण नसताना आणि अणु चर्चेदरम्यानच इराणवर हल्ले करण्यात आले, ज्यात वरिष्ठ लष्करी अधिकारी, सर्वोच्च नेते आणि अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला.
तसेच त्यांनी इस्रायलवर आरोप करत सांगितले की, लेबनॉन, गाझा, इराण, इराक आणि कतारमधील हल्ल्यांमागे इस्रायलचा हात आहे. युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी स्पष्ट अट ठेवली की, सर्वप्रथम अमेरिका आणि इस्रायल यांनी आक्रमक कारवाया तात्काळ थांबवाव्यात आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची हमी द्यावी.
पेझेशकियान यांनी इस्रायलला थेट जबाबदार धरत म्हटले आहे की, लेबनॉन (Lebanon), गाझा (Gaza), इराक (Iraq) आणि कतार (Qatar) यांसारख्या विविध ठिकाणी होत असलेल्या विध्वंसामागे केवळ इस्रायलचाच हात आहे. शांतता आणि सुरक्षिततेचा बुरखा पांघरून हा देश संपूर्ण मध्यपूर्वेत जाणीवपूर्वक अस्थिरता पसरवण्याचे काम करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.
शांततेसाठी इराणची अट आणि भारताचे आवाहन
याच संवादादरम्यान, भारताच्या पंतप्रधानांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर आणि प्रमुख पायाभूत सुविधांवर झालेल्या विनाशाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) आणि फारसी आखात (Persian Gulf) या सागरी मार्गांवरील सुरक्षा अबाधित राहणे तसेच तेथील नौवहनाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे जागतिक हिताचे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. संघर्षाचा आणि युद्धाचा मार्ग कोणत्याही देशासाठी फायदेशीर ठरू शकत नाही, त्यामुळे सर्व संबंधित राष्ट्रांनी लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, असे आवाहन मोदींनी यावेळी केले.






