Ishan Kishan | आयपीएलच्या 19 व्या हंगामाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. 28 मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होणार असताना अनेक संघांमध्ये हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सनरायजर्स हैदराबादच्या तंबूतून एक मोठी घडामोड समोर आली आहे. युवा विकेटकीपर-फलंदाज इशान किशनला नेतृत्वाची संधी मिळणार का, याबाबत सध्या चर्चेला उधाण आले आहे. (Sunrisers Hyderabad Team)
इशान किशनला मिळाली होती नेतृत्वाची संधी :
भारतीय संघातील युवा स्टार इशान किशन (Ishan Kishan) गेल्या काही महिन्यांत चर्चेचा विषय ठरला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. त्यानंतर मायदेशात झालेल्या टी20 विश्वचषकात त्याने आक्रमक फलंदाजी करत चाहत्यांची मने जिंकली आणि भारताला सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या शानदार कामगिरीनंतर आता तो आयपीएल 2026 मध्ये सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाकडून खेळताना दिसणार आहे. संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे त्रस्त असल्याने सुरुवातीच्या काही सामन्यांत त्याला विश्रांती घ्यावी लागू शकते, अशी चर्चा होती. त्यामुळे संघाचे नेतृत्व इशान किशनकडे सोपवण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जात होते. तसेच अभिषेक शर्मा याला उपकर्णधाराची जबाबदारी देण्यात आली होती.
Ishan Kishan | कमिन्सच्या पुनरागमनामुळे समीकरण बदलणार? :
दरम्यान, आता या समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज आणि संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) दुखापतीमुळे आयसीसी टी20 विश्वचषकातून बाहेर पडला होता. त्याच दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांनाही तो मुकणार असल्याचे आधी सांगितले जात होते.
मात्र कमिन्स 24 मार्चपर्यंत बेंगळुरू (Bengaluru) येथे पोहोचण्याची शक्यता आहे आणि तो स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात खेळण्यास तयार असू शकतो. सनरायजर्स हैदराबादचा पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bengaluru) संघाविरुद्ध होणार आहे. त्यामुळे कमिन्स संघात सामील झाल्यानंतर नेतृत्व कोणाकडे राहणार याबाबत सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Ishan Kishan captaincy)
जर कमिन्स पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर तो पुन्हा कर्णधारपद स्वीकारेल का, की सुरुवातीला फक्त खेळाडू म्हणून मैदानात उतरेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत कमिन्सच्या फिटनेसबाबत येणाऱ्या अपडेट्सकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






