क्रिकेट चाहत्यांसाठी डबल धमाका! टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; पाहा कधी रंगणार पहिला सामना?

On: March 24, 2026 12:55 PM
T20 series
---Advertisement---

T20 series | आयपीएलचा 19 वा हंगाम सुरू होण्याच्या तयारीत असताना भारतीय महिला क्रिकेट संघाचा आणखी एक महत्त्वाचा दौरा जाहीर झाला आहे. भारतीय महिला संघ एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अधिकृतपणे संघ जाहीर केला आहे.

एप्रिलमध्ये 5 सामन्यांची टी20 मालिका :

आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होत असताना त्याच काळात भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यात 17 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीत एकूण पाच टी20 सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) करणार आहे, तर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र प्रतिका रावलला या मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही. दुसरीकडे अमरावतीची क्रिकेटपटू भारती फुलमाळीला संघात स्थान मिळाले आहे. संघ निवडीची माहिती बीसीसीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वरून अधिकृतरीत्या जाहीर केली.

T20 series | पाचपैकी चार सामने एकाच मैदानावर :

या मालिकेतील पाच सामन्यांपैकी चार सामने दोन ठिकाणी खेळवले जाणार असल्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने डरबन (Durban) येथे खेळवले जातील. त्यानंतर तिसरा आणि चौथा सामना जोहान्सबर्गमधील वांडरर्स स्टेडियम (Wanderers Stadium) येथे आयोजित करण्यात आला आहे.

मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना 27 एप्रिल रोजी बेनोनी (Benoni) येथील विलोमूर पार्क क्रिकेट स्टेडियम (Willowmoore Park Cricket Stadium) येथे पार पडणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी निवड समितीने दोन नव्या खेळाडूंना पहिल्यांदाच टी20 आंतरराष्ट्रीय संघात स्थान दिले आहे. काश्वी गौतम आणि अनुष्का शर्मा या दोघींचा संघात समावेश करण्यात आल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

या मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय संघात हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्री चरणी, श्रेयांका पाटील, काश्वी गौतम, भारती फुलमाळी, उमा चेत्री (विकेटकीपर) आणि अनुष्का शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे.

News Title: India Women T20 Squad Announced

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now