‘मराठी माणसांसाठी तडजोड नाही’ राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्याचा टीझर आऊट

On: March 16, 2026 3:02 PM
MNS Gudi Padwa Melava
---Advertisement---

MNS Gudi Padwa Melava| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पारंपरिक आणि बहुचर्चित गुढीपाडवा मेळावा यंदाही मुंबईतील शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) मोठ्या थाटात पार पडणार आहे. या मेळाव्याचा टीझर नुकताच प्रसिद्ध झाला असून, राज ठाकरे यांच्या आक्रमक शैलीतील आवाजाने समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे.

गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या प्रश्नांवर जोरदार भूमिका मांडण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत पेजवर दोन टीझर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या टीझरमध्ये राज ठाकरेंचा दमदार आवाज ऐकू येतो आणि मराठी माणसांसाठी आवाहन करण्यात आले आहे. “महाराष्ट्रात जे चाललंय ते पटत नाहीये? रोजच्या घटना पाहून मनस्ताप होतोय? महाराष्ट्राची अवस्था पाहून अस्वस्थ झाला आहात?” असे प्रश्न विचारत समर्थकांना शिवतीर्थावर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टीझरमध्ये राज ठाकरेंच्या जुन्या भाषणातील काही भागही दाखवण्यात आला आहे. त्यात ते म्हणताना दिसतात, “मी मराठी माणसांवर प्रेम करतो, मराठी भाषेवर प्रेम करतो आणि टोकाचं प्रेम करतो. महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी भाषेबाबत कोणाशीही तडजोड करणार नाही.”

शिवाजी पार्कवर होणार सभा

मनसेचा पारंपरिक गुढीपाडवा मेळावा मुंबईतील Shivaji Park येथे आयोजित केला जाणार आहे. मराठी नववर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या या सभेत मराठी भाषा, मराठी माणसांचे प्रश्न आणि सध्याचे राजकारण यावर राज ठाकरे स्पष्टपणे भूमिका मांडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याशिवाय स्थानिक मुद्दे, राज्यातील राजकीय घडामोडी आणि सामाजिक वादग्रस्त विषयांवरही ते भाष्य करण्याची शक्यता आहे. शिवतीर्थावरून राज ठाकरे नेहमीप्रमाणे आपल्या आक्रमक शैलीत सरकारवर टीका करताना दिसतील. त्यामुळे यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp Group

Join Now