MLA Sanjay Gaikwad | आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्यावर अखेर कारवाई झाली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार आवाज उठवला होता. आता मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणामुळे सत्ताधारी गटासाठी अडचणीचं वातावरण तयार झालं आहे. समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा मुद्दा राजकीयदृष्ट्या गाजू लागला होता. अखेर पोलिसांनी ३५२ आणि ११५ (२) कलमांअंतर्गत नोंद घेतली असून विधानसभा अध्यक्षांनाही या कारवाईबाबत माहिती दिली जाणार आहे.
गायकवाड यांचं स्पष्टीकरण आणि पहिली प्रतिक्रिया :
या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी म्हटलं, “कोणीतरी सभागृहात मुद्दा उपस्थित केला म्हणून मुख्यमंत्र्यांना काहीतरी करावं लागलं असेल. पोलिसांना अशा अदखलपात्र प्रकरणात स्वतःहून फिर्यादी होता येत नाही. त्यामुळे विरोधकांच्या समाधानासाठीच हे झालं असावं.”
गायकवाड पुढे म्हणाले की, “मला याबाबत कुठलाही पश्चाताप नाही. शिंदे साहेबांनी फोन करून फक्त राग आवरून ठेवण्याचा सल्ला दिला, एवढंच.” त्यांच्या या विधानामुळे या प्रकरणाच्या गांभीर्यावरच नव्हे, तर त्यांच्या भूमिकेवरही चर्चा सुरु झाली आहे. (MLA Sanjay Gaikwad)
MLA Sanjay Gaikwad | नक्की काय घडलं? :
घटनास्थळ आहे मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास. मंगळवारी संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यानुसार मिळालेलं जेवण निकृष्ट असल्याचं सांगत त्यांनी थेट कर्मचाऱ्याला मारहाण केली. दाळीला वास येत होता, भात शिळा होता, असा आरोप त्यांनी केला. यानंतरचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि तोच व्हिडीओ नंतर व्हायरल झाला.
या प्रकारामुळे कर्मचारी संघटनांनीही संताप व्यक्त केला असून, कर्मचाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष, पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून पुढील पावले काय उचलली जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






