Pune Police Raid | पुणे (Pune) शहरातील बुधवार पेठ परिसरात मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अभूतपूर्व पोलीस हालचाल पाहायला मिळाली. सुमारे 150 पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्ते बंद करत अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली. या कारवाईदरम्यान मानवी तस्करी आणि अमली पदार्थांच्या साठ्यावर लक्ष केंद्रित करत संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. ( Budhwar Peth operation)
मध्यरात्री परिसराची पूर्ण नाकाबंदी :
बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी बुधवार पेठेला चारही बाजूंनी वेढा घातला. या कारवाईदरम्यान परिसरात ये-जा करणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते. दुचाकी, चारचाकी तसेच पायी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात होती, त्यामुळे संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून आला. ( Budhwar Peth operation)
या धडक मोहिमेत स्थानिक पोलीस, महिला पोलीस आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. गल्लीबोळांमध्ये अचानक पोलीस पथके शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी 50 पेक्षा अधिक संशयित घरे आणि कुंटणखान्यांच्या खोल्यांची झडती घेतली. या तपासात मानवी तस्करी (Human Trafficking) तसेच अमली पदार्थांचा साठा लपवून ठेवण्यात आला आहे का, याचा विशेष शोध घेण्यात आला.
Pune Police Raid | कारवाईमागील पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे :
काही दिवसांपूर्वी फरासखाना पोलीस ठाण्यातील (Faraskhana Police Station) एका महिला कर्मचाऱ्यावर बांगलादेशी तरुणीला वाचवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण केल्याचा आणि वरिष्ठांना माहिती न दिल्याचा आरोप झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले होते. या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवार पेठेतील अवैध प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. (Pune Police Raid)
या मोहिमेची तीन प्रमुख उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती. अल्पवयीन मुलींना फसवणूक किंवा जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दलालांचा शोध घेणे, परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांची, विशेषतः बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवणे, हे या कारवाईचे मुख्य उद्देश होते. शुक्रवार पेठ पोलीस चौकी (Shukrawar Peth Police Chowky) परिसरात महिला पोलिसांनी कुंटणखान्यातील महिलांशी संवाद साधून माहितीही गोळा केली.






